वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत सल्लागार बबन वडमारे यांचा पक्षाला जयभीम



बीड जिल्ह्याचे प्रभारी किसन चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर केला थेट आरोप 

बीड राजयोग प्रतिनिधी 
भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा 40 वर्षाचा आपल्या आयुष्यातील संपूर्ण प्रवास बबन वडमारे यांनी पक्ष आणि पक्षाचे संस्थापक अँड प्रकाशराव उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर नितांत निष्ठा आणि प्रेम करत केला. आपले उभे आयुष्य पक्षाच्या हितासाठी वेचले. मात्र बीड जिल्ह्याचे प्रभारी किसन चव्हाण हे पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती देतात त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा अविश्वास होतो आणि आमच्यासारख्यांचा बळीचा बकरा होतो. पक्षामध्ये ज्येष्ठ आणि निष्ठावंत असूनही अन्याय होत असल्याने मी माझ्या प्राथमिक सदस्य पदासह जिल्हा सल्लागार पदाचा राजीनामा देत असल्याचे बबनराव अश्रुबा वडमारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त म्हणून अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारिप बहुजन महासंघामध्ये बबन वडमारे यांनी युवा दशेमध्ये असताना 1984 मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यामध्ये असलेले चळवळीतील संघटना बांधणीचे कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू नेतृत्व लक्षात घेऊन अँड प्रकाशराव उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी बबन वडमारे यांच्यावर भारिप बहुजन महासंघाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दीर्घकाळ दिली. दिलेल्या पदाचा सन्मान वाढवत त्यांनी भारिप बहुजन महासंघ संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागापर्यंत नेला. पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वांचे विचार सामान्य जनतेपर्यंत बौद्ध दलित वस्तीपर्यंत नेण्याचे प्रामाणिक कार्य मागील 40 वर्षांमध्ये सातत्याने केले.भारिप बहुजन महासंघ नंतर पुढे वंचित बहुजन आघाडी मध्ये रूपांतरित झाला. साहेबांसोबत वंचित बहुजन आघाडी मध्ये देखील बबन वडमारे यांनी कायम एक निष्ठावंत कार्यकर्ता ही भूमिका पार पाडली. पक्षाने आपले कार्य लक्षात घेता बीडचे जिल्हाध्यक्ष पद द्यावे किंवा पक्षाचे प्रवक्ता म्हणून किंवा मराठवाडा स्तरावर महत्त्वाचे पद द्यावे ज्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी काम करता येईल अशी माफक अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पक्षश्रेष्ठींनी पूर्ण केली नाही. तरी देखील पक्षासोबत निष्ठेने काम केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने लोकसभेचा उमेदवार म्हणून संधी द्यावी अशी मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.यानंतर बीड विधानसभा निवडणुकीसाठी संधी द्यावी अशी मागणी केली. पक्षाकडे रीतसर दहा हजार रुपये भरून विनंती अर्ज केला. सर्व पातळीवर नंबर एक उमेदवार असतानाही बीड विधानसभेची उमेदवारी ही शेवटच्या क्षणी डावलण्यात आली. पक्षश्रेष्ठीकडून सातत्याने अन्याय होत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्याकडे अनेक वेळा वस्तूस्थिती मांडली. मात्र बीड जिल्ह्याचे प्रभारी किसन चव्हाण हे पक्षश्रेष्ठींना आणि प्रदेशाध्यक्षांना चुकीची माहिती देऊन कान भरत असल्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्याला पक्षात न्याय मिळू शकत नाही.आपल्या आयुष्याचे चाळीस वर्ष ज्या पक्षासाठी वेचले तो पक्ष जर आपल्यावर अन्याय करत असेल, विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय रण धुमाळी पेटलेली असताना जर उमेदवार आणि पक्षातील पदाधिकारी सोबत घेत नसतील, विचारात घेत नसतील तर चळवळीतील कार्यकर्ता हा बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. भूमिका घेणे हे चळवळीतील कार्यकर्त्याचे काम आहे ही भावना लक्षात घेऊन बबन अश्रुबा वडमारे यांनी आपल्या बीड जिल्हा सलागार पदासह प्राथमिक सदस्य पदाचा देखील राजीनामा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना 16 नोव्हेंबर रोजी पाठवला आहे. या राजीनाम्याची प्रत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाशराव उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्याकडे पाठवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीला जय भीम केल्याने वंचित मध्ये खळबळ उडाली असून याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार आहे.


चळवळीतील बोलका कार्यकर्ता.... 
सातत्याने दलित, वंचित शोषित पीडितांचा आवाज होत बबन वडमारे हा चळवळीतील बोलका कार्यकर्ता म्हणून बीड मतदारसंघासह जिल्ह्यासाठी परिचित आहे. बबन वाघमारे हे बीडच्या एसटी महामंडळात अनेक वर्ष वाहतूक नियंत्रक म्हणून सेवेत होते. त्याचबरोबर इंटकचे प्रादेशिक सचिव देखील आहेत. एसटी महामंडळामुळे त्यांचा सामान्य जनतेशी दररोज सातत्याने संपर्क राहिलेला आहे. जनतेच्या संपर्कातील एक अभ्यासू नेता आज वंचितने गमावला आहे. याचा फटका आगामी काळात निश्चित पक्षाला बसणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी