लिंबागणेश येथे ११ दिवसांच्या मुक्कामानंतर बाळु मामांच्या पालखीचे वैद्यकिन्हीकडे प्रस्थान ; मेंढ्यांची लोकर कात्रण सोहळा
लिंबागणेश:- ( दि.२१ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर श्रीसंत बाळु मामांच्या पालखीचे मंगळवारी पुढे वैद्यकिन्हीकडे प्रस्थान झाले. संत बाळु मामांच्या पालखीचे लिंबागणेश येथे दि.९ नोव्हेंबर रोजी आगमन झाले होते.मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत लिंबागणेश ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी केले होते. बाळु मामांच्या पालखी सोबत ३ हजार मेंढ्या आहेत.मेंढरांच्या दि.१७ नोव्हेंबर रोजी लोकर कात्रण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. भाविक भक्तांना पुरणपोळीचा महानैवैद्य समर्पित करण्यात आला.
लिंबागणेशसह पंचक्रोशीतील भाविक भक्त रोज सकाळी आरती व रात्री बाळु मामांचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी उपस्थित रहात होते.लिंबागणेश येथील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर बाळु मामांच्या पालखीचे मंगळवार रोजी वैद्यकिन्हीकडे प्रस्थान झाले.बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती यांनी एकादशीच्या दिवशी किर्तन केले.पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी ११ दिवसांमध्ये सकाळ,दुपार, संध्याकाळी अशी आपापल्या परीने सेवा दिली. प्रत्येकाने एक -एक वेळची पंगत दिली.बाळुमामांच्या तळ लिंबागणेश येथील शेतकरी गणपत तागड यांच्या शेतामध्ये होता.१९ नोव्हेंबर रोजी बाळुमामांना भगवान भालचंद्राचा मानाचा फेटा समर्पित करण्यात आला.यावेळी गणपती देवस्थानचे विश्वस्त व पुजारी श्रीकांत माधव जोशी यांनी बाळु मामांचे यथोचित पुजन केले.भाविक भक्तांच्या उपस्थितीत बाळुमामांची आरती झाली.लिंबागणेशकरांनी बाळु मामांच्या चरण पादुका,बाळुमामांचा रथ यांची लिंबागणेशनगरी प्रदक्षिणा घातली.बळीराजा सुखी व्हावा व संतांच्या शिकवलेल्या मार्गावर सर्व भाविक भक्तांनी चालावे अशी प्रार्थना केली.यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
ढोल ताशांच्या गजरात स्वागत
---
श्रीसंत सद्गुरू बाळु मामांच्या मेंढ्या आणि पालखी सोहळ्याचे लिंबागणेश येथे ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी करत भाविकांनी तर महिला भगिनींनी सडा टाकून रांगोळी काढत मोठ्या उत्साहात स्वागत केले.११ दिवस वेगवेगळे कार्यक्रम झाले.त्यामध्ये दररोज सकाळी ९ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ यावेळेत हरीपाठ आणि सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद असे नियोजन पंचक्रोशीतील भाविक भक्तांकडुन करण्यात आले होते.
मेंढ्याची लोकर कात्रण सोहळ्यात १ टन लोकर निघाली
--
रितीरीवाजाप्रमाणे दि.१६ व १७ नोव्हेंबर शनिवार, रविवार रोजी लोकर कात्रण समारंभ झाला.लोकर कात्रण करण्यासाठी महाराष्ट्रातुन कातरकरी मंडळी सेवा करण्यासाठी आली होती.वर्षातुन फक्त दोन वेळा मेंढ्यांची लोकर कात्रण केली जाते.ते म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतर आणि दिवाळी झाल्यानंतर लोकर कात्रण केली जाते.लिंबागणेश येथे मुक्कामी असणा-या ३ हजार मेंढ्यांची लोकर कातरी करण्यात आली.यावेळी १ टन लोकर निघाली. श्रीसंत बाळु मामा पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरव कारभारी आप्पा माळी म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बाळु मामांच्या १९ पालख्या असुन त्यात ३ लाख मेंढ्यांचा समावेश आहे.लिंबागणेश मुक्कामी पालखी नंबर ९ असुन यामध्ये ३ हजार मेंढ्या आहेत.
Comments
Post a Comment