योग्य उमेदवार मिळत नसल्याने शरद पवारांची फोडाफोडी - श्यामसुंदर जाधव
योग्य उमेदवार मिळत नसल्याने शरद पवारांची फोडाफोडी - श्यामसुंदर जाधव
परळी मध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी
बीड प्रतिनिधी :-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण करताना, परळी मध्ये योग्य उमेदवार मिळत नसल्याने, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला पळविण्यात आले आणि त्यांना उमेदवारी दिली. वास्तविक शरद पवार ही जागा मोठ्या मनाने काँग्रेसला सोडू शकले असते मात्र त्यांनी तसे केले नाही. शरद पवार यांच्या या भूमिकेचा बीड जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत असून, याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्यामसुंदर जाधव यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्यामसुंदर जाधव यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही एक जागा सोडण्याबाबत आग्रह धरण्यात येत होता. मात्र दुर्दैवाने बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा आली नाही. आघाडीमध्ये असलेले शरद पवार यांच्या वाट्याला जिल्ह्यातील पाचही जागा गेल्या. शरद पवार यांनी चार ठिकाणी उमेदवार दिले मात्र परळी मध्ये उमेदवार देताना त्यांच्याकडे माणूस नव्हता हे प्रकर्षाने समोर आले. यासाठी त्यांनी फोडाफोडीचे राजकारण करीत सरळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनाच फोडले आणि त्यांना तिकीटही दिले. एक प्रकारे त्यांनी बाहेरच्या पक्षाचा माणूस घेऊन जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कमकुवत असल्याचेच सिद्ध केले आहे. दुसऱ्या बाजूला ते ही जागा काँग्रेससाठी सोडून मोठेपणा दाखवू शकले असते, मात्र तेवढा मोठेपणा त्यांच्यात नाही केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्यावरच ते भर देतात हे पुन्हा एकदा या निमित्ताने सिद्ध झाले आहे. सत्ता मिळवण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो हे पुन्हा एकदा शरद पवार यांनी दाखवून दिले असल्याचे श्याम सुंदर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य करीत नसल्याने या विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने काय भूमिका घ्यायची याबाबत कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
Comments
Post a Comment