माथाडींना व शेतकऱ्यांना पेन्शन सहज मिळू शकते-विजय जावंधिया
वर्धा सेवाग्राम आश्रम -माथाडी कामगारांना व शेतकऱ्यांना पेन्शन मिळू शकते असे स्पष्ट मत शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांनी मांडले. ते पुढे म्हणाले की, स्वस्त मजूर व स्वस्त शेतमाल हे गोऱ्या सरकारचे धोरण सध्याचे सरकारने चालू ठेवले आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत व गरीब अधिक गरीब करण्याची प्रक्रिया असल्याने विषमता कायम आहे. ते बदलण्यासाठी या पेन्शन परिषदेच्या कार्यक्रमातून लढा उभारावा लागेल असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ व राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीच्या वतीने या पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पेन्शन परिषद महात्मा गांधी आश्रम सेवाग्राम येथील शांती भवन सभागृहात झाली. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ हरीश धुरट तर प्रमुख वक्ते राजकुमार घायाळ (बीड), विकास मगदूम (सांगली), हनुमंत बहिरट (पूणे) हे होते. आयोजन वर्धा जिल्हा माथाडी कामगारांच्या वतीने शेख हसन कादरी व अर्जुन खिल्लारे यांनी केले होते.
अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ हरीश धुरट म्हणाले शेतकऱ्यांना व माथाडी कामगारांना पेन्शन मिळविण्यासाठी २००३सालापासून प्रयत्न चालला आहे. सर्व कष्टकऱ्यांनाही सामाजिक सुरक्षा कायद्यातून पेन्शन मिळणार होती. परंतू सध्याच्या सरकारने तो कायदाच गुंडाळला. त्यामुळे पुन्हा लढा उभा करण्यासाठी मी. गांधी यांचे विचारातून प्रेरणा घेऊन चालावे लागेल.राजकुमार घायाळ यांनी पेन्शनचा लढा शेतकरी व माथाडी कामगार मिळून लढण्याचे आवाहन केले. विकास मगदूम यांनी माथाडी कायद्या कसा आला?या बाबतचा ईतिहास व वर्तमान परिस्थिती यावर भाष्य केले. हनुमंत बहिरट यांनी बाजार समितीच्या आवारात हमाल व मापाडी या घटकावर येणाऱ्या संकटांची नांदी स्पष्ट केली. यांतून वाचण्यासाठी संपूर्ण राज्यात ईतर कष्टकऱ्यांनाही एकत्रित करून पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यासाठी दौरे करण्याचे सुतोवाच केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन हसन कादरी यांनी केले.यावेळी हसन चौधरी,दिलीप भुसारी, गफ्फार शहा, रमेश सोनवणे आदींनी आपाआपले विचार मांडले. गौतम फुलकर, विष्णू नारनवरे,अनिल धोत्रे यांनी सहकार्य केले. या परिषदेत नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील प्रतिनिधी होते. बाजार समित्या, मालधक्का,वखार महामंडळ गोदाम, शासकीय धान्य गोदाम आदी उद्योगातील माथाडी कामगार सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment