अलहूदा उर्दू हायस्कूल मध्ये शेख इरशान जावेदचा सत्कार
अलहूदा उर्दू हायस्कूल मध्ये शेख इरशान जावेदचा सत्कार
मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
बीड (प्रतिनिधी) - शहरातील नूर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी बीड द्वारा संचलित अलहूदा उर्दू हायस्कूल येथून दहावी (एसएससी बोर्ड) परिक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेला विद्यार्थी शेख इरशान जावेद याने शालेय व आधुनिक शिक्षणावर परिणाम होऊ न देता पवित्र क़ुरआन मजीद मुखपाठ (हिफ़्ज़) केले. या निमित्ताने शाळेच्या वतीने विद्यार्थी शेख इरशान जावेद याचा शाळेकडून सत्कार करण्यात आला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा ही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना एस.एम.युसूफ़ म्हणाले की, आपल्याला जितके अधिक ज्ञान मिळते तितके आपण जीवनात अधिक वाढतो, विकसित होतो. सुशिक्षित असण्याचा अर्थ केवळ मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित संस्था किंवा संस्थांकडून प्रमाणपत्रे आणि चांगला पगार मिळवणे असा होत नाही. तर याचा अर्थ जीवनात एक चांगला आणि सामाजिक व्यक्ती होणे देखील आहे. चांगले शिक्षण घेऊन चांगला नागरिक बनणे आणि नंतर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होणे गरजेचे आहे. चांगल्या शिक्षणाशिवाय आपण अपूर्ण आहोत. शिक्षण आपल्याला योग्य विचार करणारे आणि योग्य निर्णय घेणारे बनवते. अशा स्पर्धात्मक जगात अन्न, वस्त्र, निवारा यासह शिक्षण ही मानवाची गरज बनली आहे. दहावी हा भावी करिअरचा पाया असल्याने बऱ्याच वेळा अपुऱ्या माहितीमुळे पालक आपल्या पाल्यासाठी कोणते करिअर योग्य आहे, याबाबत साशंक असतात. दहावीनंतर मेडिकल व इंजिनिअरिंग व्यतिरिक्त उपलब्ध असणारे करिअरचे इतर पर्याय, विद्यार्थ्यांचा कल पाहून योग्य पर्यायांची निवड कशी करावी, दहावीनंतर होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षण संस्था व त्यांची तयारी कशी करावी, याविषयी सखोल माहिती घेणे गरजेचे आहे असे म्हटले.
यावेळी मुख्याध्यापक डॉ. सिराज खान आरजु , सहशिक्षक मुहम्मद रफिक, शेख मोईजोद्दीन, शिक्षकेत्तर कर्मचारी शेख रफिक, मक्सूद तांबोळी, युनूस खान, शाळेचे विद्यार्थी आणि इरशान चे वडील शेख जावेद उपस्थित होते.
Comments
Post a Comment