आरटीई प्रवेश द्यावेच लागतील;शिक्षणाधिकारी यांची मुख्याध्यापकांना नोटीसा
आरटीई प्रवेश द्यावेच लागतील;शिक्षणाधिकारी यांची मुख्याध्यापकांना नोटीसा
विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्या अन्यथा आरटीई कायद्यानुसार शाळेवर कारवाई
शिक्षणाधिकाऱ्याचे सर्व मुख्याध्यापकांना पत्र
प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ - मनोज जाधव
बीड (प्रतिनिधी) शाळांचा फी प्रतिपूर्तीचा मुद्दा शाळा आणि शासनाचा आहे. यात शाळांना विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखता येणार नाहीत. असे असताना शाळा प्रवेशास नकार देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव आणि पालक आंदोलनाच्या पवित्र्यात आले असल्याने याची दखल शिक्षणाधिकारी यांनी घेतली असून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकाला पत्र पाठवून आरटीई प्रवेश देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आरटीई प्रवेश रोखल्यास आरटीई कायद्या अंतर्गत शाळांवर कारवाई करण्यात येईल असा दम देखील दिला आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना लोटला तरी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आधीच उशिराने सुरू झालेली प्रक्रिया आणि आता प्रवेशासाठी शाळांनी दिलेल्या नाकार यामुळे या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. निवड समितीमार्फत प्रवेश मिळून देखील शाळा प्रवेश देत नसल्याने विद्यार्थी दीड महिन्यापासून शिक्षणाविना घरीच बसून आहेत. शाळांनी प्रवेश नाकारल्यामुळे शिवसंग्राम चे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांच्यासह पालकांनी एकत्रित येत दि २९ रोजी जिल्हा परिषद येथे घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आज शिक्षणाधिकारी फुलारी यांनी सर्व मुख्याध्यापकांना नोटीस काढली असून आरटीई प्रवेश द्यावेच लागतील अन्यथा आरटीई कायद्यानुसार शाळेवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
शिक्षणाधिकारी ॲक्शन मोडमध्ये तर गटशिक्षणाधिकारी सायलेंट मोडमध्ये
शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नाकार दिल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काहीतरी पावले उचलणे गरजेचे होते. मात्र त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी ॲक्शन मोड मध्ये येत सर्व मुख्याध्यापकांना पत्र काढत आरटीई प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर २८ शिक्षण विस्तारअधिकाऱ्यांना प्रत्यक्षात शाळेच्या भेटी देत प्रवेश निश्चित करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या शाळा प्रवेश देण्यास नकार देतील त्यांच्याकडून लेखी घेण्याच्या सूचना देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ - मनोज जाधव
आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दि. २३ जुलै ते ३१ जुलै पर्यंत निवड समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी देण्यात आला होता. यात आता १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट पर्यंत पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आले आहे.
Comments
Post a Comment