ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळे
---
लिंबागणेश:- बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधान कारक पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.एप्रिल व मे महिन्यात पडलेल्या तिव्र उन्हामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांनी तळ गाठला आहे.१४३ धरणांमध्ये केवळ ४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील लघु ,मध्यम प्रकल्प कोरडे पडल्याने जमिनीतील पाणी पातळी घटल्याने विहिरी, बोअरवेल कोरड्याठाक पडल्याने पाणी पातळी खालावल्याने अनेक गाव वाड्या तांड्यावर तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई सुरू होते.ग्रामीण भागातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधार्थ पायपीट करावी लागते.त्यात महिला आणि लहान बालके यांच्या डोक्यावर हंडे, घागरी,सायकलला अडकवलेली केंड, घागरी व इतर माध्यमातून पाणी मिळवण्यासाठी त्यांची धावपळ दिसुन येते.अलीकडे पुरुष मंडळी घरातील महिलांसोबत पाणी भरण्याच्या मदतीसाठी येत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न मात्र तोकडे पडताना दिसत असुन जिल्हा प्रशासन पाणीटंचाईचा आराखडा वातानुकूलित रुम मध्ये बसुन प्रसारमाध्यमांतुन पाणीटंचाई वर मात करण्यासाठी आवाहन करत निर्धास्त असल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर माहितीस्तव
---
बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील २०० लोकसंख्या असलेली भोसले नामक दलित वस्ती.सार्वजनिक विहीरीत भायाळा साठवण तलावातुन आठवड्याला पाणी सोडले जाते.७ परस विहीरीतील पाणी शेंदुन सांडपाण्यासाठी वापरावं लागते. पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट आहे. संपूर्ण वस्तीला सध्या एकाच हातपंपाचा आधार असुन अधुन मधुन १०-२० हंडे पाणी येते त्यामुळे लहानमुले आपला नंबर येण्याची वाट बघत असतात.संपुर्ण वस्तीला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने बोअरवेल द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.संबधित प्रकरणी सरपंच मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता पंचायत समितीकडे बोअरवेल आणि टँकरचा प्रस्ताव मार्चमध्येच पाठवला असुन अजुन प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय येण्याची वाट पहात असल्याचे सरपंच बिभीषण मुळीक यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाई आढावा बैठकीत मदतीचे आवाहन ; वास्तवात आश्वासनावर बोळवण
---
बीड जिल्हा प्रशासनाने वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आराखडा आखताना पाणीटंचाईच्या अनुषंगाने टँकर मंजुरीबाबत काही अडचणी असल्यास संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना तसेच पाणीटंचाई विषयी काही तक्रार असेल तर जिल्हा परीषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी केलेले आहे. मात्र संबंधित प्रकरणात आधिका-यांशी संवाद साधल्यानंतर फक्त आश्वासनच पदरी पडताना दिसत आहे.केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत प्रति व्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
अशुद्ध पाण्यामुळे जलजन्य आजाराबरोबरच पाणीवाहण्याने महिलांना शारीरिक आजार :- डॉ.गणेश ढवळे
---
ग्रामीण भागातील बहुतांश जलशुद्धीकरण केंद्रे धुळखात पडुन असुन अशुद्ध पाण्यामुळे अतिसार ,काविळ,विषमज्वर आदि जलजन्य आजार पसरत असतानाच विहिरीतल्या आणि बोअरच्या पाण्यात जास्त प्रमाणात क्षार आढळतात. खरडुन पाणी उपसा करत असल्याने जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो.ग्रामिण भागातील बहुसंख्य महिलांच्या शरीरात रक्त कमी असल्याने ॲनिमिया आजाराची थकवा येणे, चालताना दम लागणे आदी तक्रारी असतात. मुळातच शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्याने विहिरीतुन पाणी शेंदल्याने तसेच डोक्यावरुन पाणी वाहुन आणण्यामुळे मणक्यांच्या आजारांचे आढळून येतात.
Comments
Post a Comment