जीबीएस आजार अत्यंत दुर्मिळ, चर्चा मात्र गंभीर!

जीबीएस आजार अलीकडच्या काही दिवसात जाम चर्चेत आला आहे. वास्तविक पाहता जीबीएस आजार हा अत्यंत दुर्मिळ आहे. लाखो-करोडो लोकांमधून एखाद्यालाच हा आजार होतो, असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय हा आजार काही नवीन नाही, बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात आहे. अलीकडील काही दिवसात या आजारावर चर्चा मात्र अतिशय गंभीरपणे होत आहे. म्हणून या आजारावर हा लेख प्रपंच. कृपया संपूर्ण लेख आवर्जून वाचावा. बहुतेक या आजाराविषयी होत असलेली चर्चा व भीती दूर होईल.
----------------------------------------
आजार कोणताही असो वेळीच औषधोपचार घेतल्याने तो निश्चितपणे बरा होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कृपया जीबीएस आजाराचं कोरोना सारखं बाऊ करू नका. घाबरून जाऊ नका. लक्षणे दिसून आल्यास वेळीच तपासण्या करून उपचार करून घ्या. तसे पाहता जीबीएस हा आजार काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तो अस्तित्वात आहे. हे आपण युट्युब वर किंवा गुगल वर जाऊन पाहिले तर सहज दिसून येईल. गेल्या काही वर्षात युट्युब वर या आजाराविषयी अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आपल्याला दिसून येतील. तसेच गुगल वर सुद्धा याविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. आपण या जीबीएस आजाराविषयी युट्युब आणि गुगल वर पाहू शकता. असे असताना जर कुठे या आजाराचे रुग्ण समोर येत असतील तर त्याचा बाऊ करून इतरांना घाबरवून सोडण्याचे काही एक कारण नाही. जीबीएस या आजाराला दुर्मिळ म्हणून ओळखले जाते. दुर्मिळ या शब्दाचा अर्थच मुळात क्वचित आढळणारा असा होतो. म्हणून हा आजार काही सर्दी, पडसे, खोकला, ताप यासारखा अनेकांना होत नाही हे निश्चित. शिवाय या आजाराचा स्वतंत्र असा कोणताही व्हायरस नाही. म्हणून हा आजार जडताना जी काही लक्षणे आढळू शकतात त्यापैकी कोणतेही लक्षण आपल्यात आढळून आले तर सर्वप्रथम तज्ञ डॉक्टरांना दाखवून आवश्यक त्या तपासण्या करून योग्य ते उपचार करून घ्यावेत. कारण आजार कोणताही असो त्याचे वेळीच निदान करण्यात आले तर तो हमखास बरा होतो. माणूस एकापेक्षा एक भयंकर आजारांना पुरून उरला आहे हे लक्षात घ्या. काही वर्षांपूर्वी पर्यंत मानवाच्या फुफ्फुसांना चाळणीसारखा करणारा क्षयरोग देखील आता जवळपास हद्दपार होत आला आहे. कर्करोगावर यशस्वीपणे उपचार होत आहेत. एड्स सुद्धा देशात आला होता की नव्हता असा झाला आहे. तेव्हा जीबीएस आजाराचं कोरोना सारखं बाऊ करू नका, घाबरू नका, लक्षणे दिसताच वेळीच तपासण्या करून उपचार करून घ्या. लक्षात घ्यावे की, जीबीएस या आजाराचा कोणताही स्वतंत्र असा व्हायरस नाही. ज्याच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते किंवा ज्याची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते त्याला हा आजार होऊ शकतो. बॉयलर चिकन खाण्यामुळे हा आजार होतो ही सुद्धा एक शुद्ध अफवा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जीबीएस या आजाराची काही लक्षणे

सुरुवातीला सर्दी, खोकला येणे. शरीराच्या नसांवर आघात होणे. सुरुवातीला पाय दुखणे. हात-पाय लुळे पडणे. हातांच्या नसा कमजोर होणे. हाता पायाला मुंग्या येणे किंवा बधीर होणे. स्नायू कमजोर होणे. चालताना, बोलताना अडथळे येणे. गिळायला त्रास होणे. प्रचंड थकवा जाणवणे. श्वास घेण्यास त्रास होणे. आजार जास्त वाढल्यास उठणे-बसणे ही अवघड होणे. हात खांद्यांपासून वर न होणे. आजार जास्तच वाढल्यास डोक्यावर ही परिणाम होऊ शकतो. कारण जीबीएस मुळे मानवाच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती व्हायरसवर अटॅक करण्याऐवजी आपल्या शरीराच्या नसांवरच हल्ला करते. ही त्याची लक्षणे असू शकतात.

कोरोना सारखाच फुफ्फुसांशी निगडित पण .....

सन २०२० सालच्या मार्च महिन्यात जगाच्या इतर देशासारखाच आपल्या भारतात येवून जवळपास दोन वर्षे थैमान घातलेल्या कोरोना या आजारासारखाच हा जीबीएस चा आजारही फुफ्फुसाशी निगडित आहे. फरक फक्त एवढाच आहे की, कोरोना मानवाला सर्दी-पडसे झाल्यानंतर फुफ्फुसावर अटॅक करत होता तर जीबीएस हा आजार मानवाच्या पायापासून सुरू होऊन फुफ्फुसापर्यंत पोहोचतो.

कोरोना होऊन गेलेल्यांना

कोरोनाच्या लाटेत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना जीबीएस हा श्वसनाशी संबंधित दुर्मीळ आजार जडू शकतो. मात्र कोरोनामुक्त रुग्णाला हा आजार होणे हे अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

वेळेत उपचार केल्यास रुग्ण दहा दिवसात बरा होतो

वेळेत निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण जीबीएस च्या आजारातून बरा होऊ शकतो. जसे कोरोना झाल्यास रूग्णाला ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर लावणे आवश्यक होते, तसे जीबीएस मध्ये प्रत्येक रुग्णाला व्हेंटिलेटर लागू शकत नाही. व्हेंटिलेटर लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण साधारण २० ते ३० टक्क्यापर्यंतच असते. जीबीएस झालेल्या रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी इंजेक्शनचा कोर्स पाच दिवस दिला जातो. १० दिवसांनी रुग्ण परत घरी जाऊ शकतो. असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

गुलियन बर्रे सिंड्रोम अर्थातच जीबीएस हा आजार झालाच तर .....

तसे हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे. पण कुणाला जर झालाच तर मात्र यावरील उपचार बरेच खर्चिक आहेत. या रोगातून बरे होण्यासाठी लागणारे इंजेक्शन हे हजारो रुपये किमतीचे असून या आजारातून बरे होण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो.

जिल्हा रुग्णालयात जीबीएस चे इंजेक्शन उपलब्ध

बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात जीबीएस वरील गुणकारी इंजेक्शन उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला या रोगाशी संबंधित लक्षणे दिसत असतील अशांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करून उपचार करून घ्यावेत. तसेच एवढा मोठा लेख प्रकाशित केल्याबद्दल या दैनिकाचे आभार मानावे. कारण या दैनिकाच्या माध्यमातूनच आपण हा लेख वाचू शकलात, धन्यवाद ....!
लेखन - एस.एम.युसूफ़(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी