जाती-अंताच्या चळवळीला जागतिक स्तरावर नेणारे,कर्मवीर -एकनाथ आवाड“जिजा

जाती-अंताच्या चळवळीला जागतिक स्तरावर नेणारे,कर्मवीर -एकनाथ आवाड“जिजा”....

25 मे ही कर्मवीर एकनाथराव आवाड - ज्यांना प्रेमाने “जिजा” म्हटले जाते – ह्यांचा स्मरणदिवस. जिजांना जाऊन आज 9 वर्ष होत आहेत परंतु ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ ह्या उक्तीनुसार ते आजही आपल्याला प्रेरणा देत आपल्या सोबत आहेत. मांग जातीच्या पोतराजाच्या एका साधारण कुटुंबात जन्मलेली एक व्यक्ति हलाखीच्या परिस्थितीत शिकून, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अवलंब करून, जाती-अंताची व त्याद्वारे सामाजिक समतेची मशाल लाखों वंचितांच्या हातात देवून जातो हे जितके खरे आहे तितकेच कल्पना करण्यापलिकडलेही आहे!
मला माझ्या अभ्यासाच्या योगाने जिजांनी 1989 साली स्थापन केलेल्या ‘मानवी हक्क अभियान’ ह्या संघटनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी, शेकडो दलित आणि वंचित परिवार ज्यांच्या आयुष्याला जिजारूपी परिसाचा स्पर्श झाला त्यांचासोबत वेळ घालविण्याचा योग आला. मी माझे अनुभव कथन माझे 6 वर्षापासूनचे अमेरिकेतील वास्तव्य, माझ्या जमीन आणि जात ह्या संबंधातील पुस्तकी अभ्यास आणि मराठवाड्यातील क्षेत्र भ्रमण ह्या आधारे केले आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘जातीव्यवस्थेचे निर्मूलन’ (Annihilation of Caste) ह्या लेखाला 15 मे रोजी 88 वर्षे पूर्ण झाली. जिजांनी प्रत्येक श्वास ह्या लेखात लिहिलेल्या तत्त्वांना प्रत्यक्षात आणण्यासाठी मोलाने खर्ची घातला. भारतासारख्या देशात जेथे जातीव्यवस्थेची मुळं शेकडो वर्षापासून घट्ट पाय रोवून आहेत तिथे हे काम वाटतं तेव्हढं सोप्प नाही. ह्या कामाची सहसा लोकांना कल्पना देखील येऊ शकत नाही. ह्या अथक प्रयत्नात कित्येकदा जिजांवर प्राणघातक हल्ले झाले. जिजांना ही जाणीव होती की जातीअंताचा लढा हा कित्येक शतके अर्ध्यपोटी गुलामगिरी करणारा समाज हा उपाशी राहून करणं शक्य नाही. म्हणून गायरान आणि सरकारी जमीन काबीज करण्याच्या मोहीमेचे बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर जिजांनी नेतृत्व करून तिला महत्तप्रयासाने सामाजिक पटलावर महत्त्वाचं स्थान आणलं. प्राथमिक अवलोकनावरून गायरान जमिन काबीज करण्याचा उद्देश हा केवळ त्यावर शेती करून पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे इतका साधा वाटला तरी तो तेव्हढाच मर्यादित नाही. बहुल्य दलित समाज ग्रामीण भागात राहत असल्यामुळे गायरान जमीन काबीज करणे हा जाती-अंताच्या तात्त्विक लढाईचे एक महत्त्वाचे प्रात्यक्षिक आहे. हजारो वर्षापासून जाती-आधारित विभागलेल्या समाजात, दलित आणि इतर वंचित समुदायाने प्रस्थापितांच्या विरुद्ध जावून गावातील शेकडो एकर गायरान जमीन ताब्यात घेणं गरजेचं होतं. त्यासाठी लागणारी हिम्मत व आत्मविश्वास ह्या वंचित समुदायात भरवणं आणि प्रस्थापितांच्या मनात दडपण निर्माण करणं अतिशय महत्त्वाचं होतं. अर्थातच त्यासाठी लागणारी हिम्मत, हुशारी, आणि मुत्सद्दीपणा जिजांकडे पुरेपूर होता किंबहुना त्यांनी तो चळवळीत असतानाच जैविकरित्या (organically) अंगिकारला होता. माझ्या मराठवाडा भ्रमणात मला कित्येक परिवार भेटले की ज्यांचासाठी जमीन अर्धा की पांच एकर आहे, बागायती की कोरडवाहू आहे ह्यापेक्षा स्वतःच्या जमीनीचा तुकडा असण्याचा स्वाभिमान हा बेशकिमती आहे असे वाटते!
प्रस्थापितांकडची लाचारी नाकारून मानाने जगण्याची कला जिजांनी पोटच्या पोरासारखी आम्हाला शिकवली हे जेव्हा कित्येक गावातून कानावर पडतं तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. जिजांच्या भाषणाच्या आठवणी आजही लोकांच्या अंगावर शहारे आणतात. कित्येक लोकांची आयुष्य फक्त जिजांची भाषणं ऐकून बदलली आहेत हे आश्चर्यकारक वाटलं तरी नितांत खरं आहे. जिजांनी आमची मुलं शिकवून कलेक्टर व्हावीत म्हणून झोळी पसरून आमच्याकडे भीक मागितली म्हणून मी माझी मुलं शिकवली असे म्हणणारे कित्येक भेटले. लोकांनी जिजांची भाषणं ऐकून व्यसनं सोडली, बाल-विवाह थांबवले, निवडणुकी लढवल्या, स्वतःची जमीन विकत घेऊन घरं बाधली आणि स्थलांतर थांबवले, असे कित्येक अनुभव मराठवाड्यातल्या कानाकोपर्यातल्या गावची लोकं डोळ्यात पाणी आणून सांगतात तेव्हा जिजांची ही कर्तबगारी ऐकुन गुंगी येते. मग त्यांनी आपल्या घरात गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, सावित्री-जोतिबा फुले, अण्णाभाऊ साठे ह्यांचा रांगेत जिजांना बसवले ह्यात आश्चर्य ते काय?
महाराष्ट्रातील एक लाखाहुन अधिक विविध जाती-धर्माच्या कुटुंबांचे भविष्य मानवी हक्क अभियानाच्या चळवळीतून आमुलाग्र बदलले आहे. अभ्यासपूर्वक आणि जवाबदारीने मी हे मांडू इच्छितो की मानवी हक्क अभियानाची जाती-अंताद्वारे जमीन मिळवून स्वाभिमानाने जगायला शिकवणारी चळवळ ही केवळ महाराष्ट्र, भारत किंवा दक्षिण आशिया खंडातच नाही तर वैश्विक स्तरावरची महत्त्वाची चळवळ आहे. लॅटिन अमेरिकेन खंडातील ब्राजील देशातील Landless Workers Movement (Movimento dos Trabalhadores Rurais Sem Terra; MST) चळवळ ही नक्कीच मानवी हक्क अभियानाच्या तोडीची आहे असे म्हणणे अतिशयोक्ति ठरणार नाही! अमेरिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध लढलेले रोजा पार्क आणि मार्टिन ल्युथर किंग, जु.; ब्लॅक पॅंथर चे संस्थापक बॉबी सील आणि हुयी न्यूटन; नॅशनल असोसिएशन फॉर द अडवांसमेंट ऑफ कलर्ड पीपल (NAACP) चे डबलयू. बी. ई. डी बॉय, ठरगवूड मार्शल, रॉय विलकीन्स यांचा इतकेच महत्त्वाचे काम कर्मवीर एकनाथराव आवाड यांनी मानवी हक्क अभियानाच्या वतीने जातीअंतासाठी केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत ह्या चळवळीसाठी झोकून दिलेले मानवी हक्क अभियानाचे असंख्य कार्यकर्ते आणि प्रसंगी आपले प्राण पणास लावून गायरान काबीज केलेले लाखों परिवार अभिनंदनास पात्र आहेत. ह्या जागतिक स्वरूपाच्या चळवळीचे नेतृत्व करणारे कर्मवीर एकनाथराव आवाड “जिजा” हे महाराष्ट्राचेच नाहीत तर भारताचे “रत्न” आहेत. असे असताना त्यांना आजपर्यंत भारत सरकारचा पद्म पुरस्कार न मिळणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
चळवळीत जिजांना त्यांची पत्नी श्रीमती गयाबाई आवाड “जिजी” यांची लाभलेली साथ ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी कुटुंब सांभाळतच चळवळीला हातभार लावला आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजातले प्रश्न तडीस नेले. सूक्ष्म सामाजिक भान, जाणिवेतून निर्माण केलेली कर्तबगारी आणि तरीही कमालीची विनम्र असणारी मुलं सौ. शालन, डॉ. मिलिंद, आणि डॉ. सुरेखा ह्यांच्या जडण-घडणीत जिजांसोबत जिजींचाही कमालीचा वाटा आहे. जिजांपश्चात मानवी हक्क अभियानाच नेतृत्व प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांचासारखा अभ्यासू, कुशल, आणि द्रष्टा व्यक्ति करत आहे हे चित्र सुखावह, ऊर्जादायी आणि आशावादी वाटणारं आहे. वेगाने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेत सामाजिक चळवळींचे स्वरूप काय असेल आणि ती भूमिका अभ्यासपूर्वक कशी मांडता येईल ह्याचे वैश्विक चिंतन करण्याची क्षमता आणि ते तडीस नेण्याची कार्यनिपुणता प्रा. डॉ. मिलिंद आवाड यांच्याकडे आहे ह्याची जगभरातल्या माझ्यासारख्या कित्येक अभ्यासक आणि कार्यकर्त्यांची पूर्ण खात्री आणि विश्वास आहे.     

‘आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी’ असं ब्रीदवाक्य असणाऱ्या मानवी हक्क अभियानाची चळवळ ही जाती-अंताची असली तरी तिचा उद्देश हा असमानतेच्या वृत्तीवर घाव घालणे आहे. असमानता दाखवणाऱ्या जनसमुदायावर हल्ला करणे नाही. हा फरक समजावून घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे – हा फरक कळला नाही तर चळवळीच्या उद्देश जातीचा अंत करण्याऐवजी जाती-अंताला विरोध करणाऱ्यांचा लक्ष्य करणे असा घेऊन चळवळ हिंसक आणि रक्त-रंजीत बनू शकते. मी अशा कित्येक संवेदनशील उच्च-जातीय लोकांना भेटलो ज्यांना जिजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या चळवळीपददल नितांत आदर आहे किंबहुना ते त्यांचे पुरस्कर्ते आहेत! जिजा आपल्या चळवळीला सहजाचं ‘दलित’ हक्क अभियान हे नाव देवू शकले असते पण तसं न करता त्यांनी ‘मानवी’ हक्क अभियान हे शीर्षक देऊन आपली सर्वसमावेशक भूमिकाच समोर आणली आहे. जिजांच नेतृत्व हे केवळ मांग समाजापर्यंत सीमित करण किंवा त्यांना फक्त ‘दलितांचा पुढारी’ मानण हे सूर्याला काजवा म्हणण्यासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना ‘दलित पुढारी’ मानून त्यांच्या व्यासंगाचे रिंगण छोटे करण्याची कुचेष्टा आधीच आपल्या समाजाने केली आहे. ही त्याचीच पुनरावृत्ति म्हणायची. आपण सर्वांनीच जिजांच्या बाबतीत होणारी ही कुचेष्टा प्रयत्नपूर्वक हाणून पाडली पाहिजे व जिजांची ‘मानव’ असण्याची व्यापक संकल्पना पुढे नेली पाहिजे!  


जिजांचं काम हे अमूल्य आहे ह्यात कोणालाही यत्किंचितही शंका नसावी. भाषण करताना ‘शाहू-फुले-आंबेडकर’ म्हणायची प्रथा महाराष्ट्रात आहे. ह्या तिकडीत कर्मवीर एकनाथराव आवाड यांना बसवण्याची आता वेळ आली आहे. आज जिजांच्या स्मरणदिनाच्या निमित्ताने आपण आपल्या संबोधनात ‘शाहू-फुले-आंबेडकर-आवाड’ बोलण्याची प्रथा जाणीवपूर्वक सुरू केली पाहिजे. असे केल्याने शाहू, फुले आणि आंबेडकर हे आपल्याला परलोकी योग्य साथीदार मिळाला असं वाटून आनंदून गेल्याशिवाय राहणार नाहीत...!   
विशाल जामकर (मोबा: 77381 95785) हे यूनिवर्सिटी ऑफ मिंनेसोटा, अमेरिका येथे जमीन आणि जात ह्या संबंधावर पीएचडी करत आहेत. ते चार महिन्यापासून माजलगाव, बीड येथे मुक्कामाला असून आपल्या अभ्यास दौऱ्यात मराठवाड्यातील मानवी हक्क अभियानाशी संबंधित परिवार आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक राजकारणी आणि अधिकारी यांच्याशी वार्तालाप करत आहेत..

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी