तीन ची आवश्यकता असताना लावली एकच पाटी, तीही चुकीच्या ठिकाणीनागरिकांवर सुड उगवत आहात काय? - एस.एम.युसूफ़
बीड (प्रतिनिधी) - शहरातील आसेफ़नगरचा मुख्य रस्ता व नाला कामाचा आता येथील रहिवाशांसह या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अक्षरशः वीट येऊ लागला आहे. बीड नगर परिषदेसह अभियंता, गुत्तेदार, सुपरवायझर आणि कामगार हे सर्वजण मिळून सूड उगवत असल्याचा अनुभव नागरिकांना येत असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून येथील रस्ता व नाल्याचे काम अगदी भिजत घोंगड्याप्रमाणे निव्वळ कासव गतीने सुरू आहे व ते कधी पूर्ण होईल हे गुत्तेदार अभियंतासह बीड नगर परिषद सुद्धा जबाबदारीने सांगू शकत नाही अशी एकंदरीत अवस्था आहे. यामुळे याजागी येऊन मिळणाऱ्या तिन्ही मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स ठेवून त्यावर सूचना फलक लावण्यात यावे अशा आशयाची बातमी प्रसिद्धी माध्यमातून दिली होती. त्याला आता १० दिवस उलटून गेले आहेत. तरीसुद्धा अजून पर्यंत तिन्ही रस्त्यांवर बॅरिकेट्स ठेवण्यात आले नाही. बातमीची दखल घेऊन गुत्तेदाराने सूचना फलक तयार करून पाट्या पाठवून दिल्या खऱ्या मात्र गुत्तेदाराने नेमणूक केलेले सुपरवायझर आणि कर्मचारी एवढे हुशार? की, जिथे सूचना फलकाच्या पाट्या लावणे आवश्यक आहे तिथे न लावता त्यांनी भलत्याच ठिकाणी फक्त एक पाटी लावली. बाकीचे सूचनाफलक आणि पाट्या गायब. हे चुकीचे नियोजन पाहता याविषयी पुन्हा एकदा गुत्तेदाराला व्हाट्सअप वरून मेसेज टाकला असता त्यांनी "ओके" म्हणून उत्तर तर दिले परंतु तीन दिवस उलटूनही येथील नियोजन व्यवस्थित करण्याकरिता ते काही इकडे फिरकले नाहीत. म्हणून चुकीच्या ठिकाणी लावलेली एक पाटी तीन दिवसापासून आहे तिथेच आहे. मात्र जिथे बॅरिकेट्स ठेवून त्यावर सूचना फलक लावणे आवश्यक आहे अशा शिवराज पान सेंटर चौक, मेहेराज मस्जिद चौक, जुने एस.पी. ऑफिस गेट समोर या तीन ठिकाणी अजूनही ना बॅरिकेट्स लावण्यात आले, ना त्यावर सूचना फलक. म्हणून या रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना खांदलेल्या नाल्यापर्यंत येऊन परत फिरावे लागत आहे. शिवाय पादचाऱ्यांनाही हाच अनुभव घ्यावा लागत आहे. लांब वळसा व हेलपाटा मारावा लागत आहे. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक बीड नगर परिषदेसह अभियंता, गुत्तेदार, सुपरवायझर आणि कामगार यांना असल्याचे दिसत नाही. म्हणून हे सर्वजण मिळून सुड उगवत असल्याचा अनुभव नागरिकांना येत असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे आहे.
Comments
Post a Comment