भाऊ बामण गेल्याची बातमी समजली आणि क्षणात मी हताश झालो. काही केल्या डोळ्यातून बाहेर यायला तयारच होईना भाऊ बामण. तसाच डोळ्यांच्या पापणीत घट्ट रुतून बसलेला.



{अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

 कधी काळी त्यानं म्हंटलेला कानात अजूनही तोच आवाज, “तुज्या बापाच्या लग्नाचा आंतरपाट म्याच धरला अन तुजा बी म्याच! तुमच्या आज्ज्या-पंज्ज्या सकट सगळ्यांचं महाळ बी म्याच केलं, पण कधी तुमच्याकडून एक रुपया बी घेतलेला नाय!” माणसं म्हणायची, “झोपलेला देव जागा करण्याची हिम्मत फ़क्त पांडोबाच्या हलगीत अन भाऊ बामणाच्या घंटीतच आहे.” भाऊ बामण नुसत्या गावाचा बामण नव्हता तर अख्ख्या पंचक्रोशीचा बामण होता. तांबडं फुटायच्या आधीच जाग यायची त्याला. अगोदर भाऊ बामण जागा व्हायचा मग जाग यायची गावाला. अंधारात गोठ्यातली रिकामी बादली घेऊन मंदिरापुढच्या आडावर हजर व्हायचा भाऊ बामण. राहाटावरून खाली बादली सोडून साखर झोपेत असलेलं पाणी शेंदायचा भाऊ बामण. कितीही कडाक्याची थंडी असो, पावसाची कितीही उभी धार असो, तरीही थंड पाण्याने गावात पहिली अंघोळ उरकायचा भाऊ बामण. कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगावर दानवं घातलेला भाऊ बामण गावच्या देवळातली ठण-ठण आवाज घुमवत जेव्हा पहिली घंटा वाजवायचा, तेव्हा कुठे जाग यायची गावाला. माणसं म्हणायची, “गड्या भाऊ बामण उठला! पहाट झाली! उठा आता!”
गावात तशी बामणाची मोजून चार घरं. एकाच बुडक्यातली. एकाच रांगेत उभी. छोटीशी बामण गल्लीच. गावच्या प्रमुख मंदिरातील पूजा अर्चा यांच्याकडेच आळी पाळीने येई. कालमाना नुसार यातील तीन घरे कायमची शहराकडे स्थलांतरित झाली. गावगाड्यात उरलेला भाऊ बामण मात्र गावाला चिकटून मागं राहिला. कशासाठी राहिला असेल? माहीत नाही. पण वडिलोपार्जित मिळालेल्या शेताच्या तुकड्यात आयुष्यभर तो राबला. नेमका कुणासाठी तो राबला असेल? माहीत नाही. त्यानं त्याचं अख्खं आयुष्य गावकी करण्यातच का घालवलं असेल? ते ही माहीत नाही. भाऊ बामणानं सबंध आयुष्यात पायाला कधीही चप्पला घातल्या नाहीत. आयुष्यभर तो अनवाणी पायानं जमीन तुडवत आणि सायकलचं पायंडल मारीत राहिला. माणसं म्हणायची, “कोणताही विधी करावा तर भाऊनच!” घाई नाही की गडबड नाही. सगळं कसं त्याच्या हातून शांततेत पार पडणार. भाऊ बामणानं अख्ख्या पंचक्रोशीतील कित्येक पिढ्यांची लग्ने लावली. कित्येक घरात शांततेचे होमहवन पेटवले. कित्येकांचे अभिषेक घातले. कित्येक घरात सत्यनारायणाचे सकळ खंडाचे अध्याय वाचले. कित्येक घरांच्या कुंडल्या जुळवल्या. कित्येक घरांची साडेसाती घालवली. सत्यनारायणा ची पूजा वाचताना त्याने एका विशिष्ट लयीत वाचलेली साधू वाण्याची कथा अजून माणसांच्या कानात तशीच घुमते. खरं खोटं माहित नाही पण अजून जुनी माणसं सांगतात, “भाऊ बामणाचा हात जर पिंडाला लागला नसेल तर कावळा सुद्धा शिवायचा नाही पिंडाला!”

बारशापासून ते चौदाव्या पर्यंतचे सर्वच कार्यक्रम अगदी यथासांग पार पाडायचा भाऊ बामण. पितृ पंधरावड्यात तर त्याची सायकल कधी थांबायचं नावच घ्यायची नाही. गावासोबत साऱ्या पंचक्रोशीत महाळ घालायच्या विधीचा मान हा भाऊ बामणालाच असणार. त्याशिवाय वाडवडील जेवले असं म्हणताच यायचं नाही. आता कदाचित तुम्हाला वाटेल की, भाऊ बामणानं त्याच्या आयुष्यात चिक्कार कमाई केली असेल. पण मंडळी, यातलं काहीच त्यानं केलं नाही. मिळेल त्या पसा-मूठ शिदोरीवर त्यानं आयुष्यभर गावगाड्यातली गावकी सांभाळली. मंदिराच्या दानपेटीत कधीही त्याच्या हाताची बोटे शिरली नाहीत की तिजोरीत असलेल्या देवीच्या जुन्या दागिन्यावर त्याची नजर रुतली नाही. की कधी त्याच्या बायकोच्या गळ्यातल्या काळ्या मण्यांचं, सोन्याच्या मण्यात रूपांतर झालं नाही. इतका प्रामाणिक आणि विश्वासू होता भाऊ बामण.

पण त्याचं दुर्दैव हे की भाऊ बामणाला फक्त पाच वर्षेच संसार लाभला. एका सकाळी आडावर धुणं धुवायला गेल्यावर पाणी शेंदताना त्याची बायको आडात पडली. आडावर ओरडून बायकांनी नुसता कल्लोळ उठवला. सगळं गाव आडाकडं पळत सुटलेलं. पण बिन पायऱ्याचा आड. कोणी उडी मारायचं धाडसच करेना. अखेर मातंगवाड्यात कोणीतरी पळत जाऊन निरोप दिला. क्षणाचाही विलंब न लावता पट्टीचा पोहणारा चंदू नाईक आडाच्या दिशेने धावत सुटला. त्याने आडात कपड्यासहीत उडी टाकली. काही वेळातच तळातून रहाटाच्या साखळीला बांधून भाऊ बामणाच्या बायकोचं प्रेत त्यानं वर काढलं. उशीर झाला होता. तिला वर काढल्यावर “आरं रं रं लई वाईट झालं गड्या! नांदनं कडंवर जायाला पायजे व्हूतं! बयो कशी ग घसरलीसं आडात! लेकरानं कुणाला गं आय म्हणून हाक मारावी आता!” म्हणत चंदू नाईक मुळातून हळहळला.

दिवस पुढे सरकले. भाऊ बामण हळूहळू या दु:खातून बाहेर आला. पण त्यानं दुसरं लग्न काही केलं नाही. त्याच्या आई वडिलांसोबत त्यानं लहान पोर वाढवलं. शिकवलं. पोरगं मोठं झाल्यावर ते कामधंद्यासाठी शहराकडे बाहेर पडलं. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण हळूहळू पोरगं गावाला यायचं कमी झालं. भाऊ बामण गावाकडून पत्र पाठवायचा. सुरुवातीला उत्तर यायचं. पण नंतर-नंतर पत्राला उत्तर येईनासं झालं आणि अशातच एक दिवस गावात कोणी तरी बातमी आणली. ‘भाऊ बामणाच्या पोरानं तिकडंच कुठल्यातरी पोरीशी लग्न केलयं.’ भाऊ बामणाच्या कानांवर ही बातमी पडली. खात्री करण्यासाठी एक दिवस भाऊ बामण शहराकडे जाऊन आला. माघारी आल्यावर पोराचा नवा संसार सुरळीत आणि सुखाचा चालू असल्याचं त्यानं गावाला सांगितलं. खरं खोटं काय ते भाऊलाच माहीत. काही दिवसातच गाव भाऊच्या पोराला विसरून कामाला लागलं...

... एक-दीड वर्षे उलटलं असेल. अचानक भाऊचा पोरगा मतदानाला म्हणून एकटाच गावाला आला. महिना झाला. दोन-महिने झाले तरी परत जाण्याचे काही नावच घेईना. गावात हळूहळू कुजबुज सुरू झाली. रिकामी डोकी वळवळू लागली. आणि कुठून तरी गावाला खरी बातमी समजली. भाऊ बामणाची सून त्याच्या पोराला घटस्फोट देऊन निघून गेलीय. भाऊनं हळूहळू माणसात उठणं बसणं बंद केलं. अन्न पाण्यावरची त्याची वासनाच उडाली. आजूबाजूच्या गावात जाणंही त्यानं बंद केलं. गावातलं विधीकार्यही त्यानं कमी केलं. काही महिन्यांनी भाऊचा पोरगा पुन्हा शहराकडे वळाला. पण पुन्हा काही तो गावाकडे परतला नाही. 

काळ हळूहळू पुढे सरकत राहिला. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे संपत गेली. भाऊचे आई-वडीलही कधीच गेले होते. भाऊ बामणही म्हातारपणाकडे झुकला. मावळतीच्या सावल्या त्याच्या अंगावर कधी चढून बसल्या गावाला कळले सुद्धा नाही आणि एके दिवशी दिवस उगवायला भाऊ बामण गेल्याची बातमी गावभर पसरली. गावातले व्यवहार थांबले. नव्या दुकानांची उघडलेली शटरे पुन्हा झाकली गेली. भाऊ बामणाच्या पडक्या घरापुढं माणसांची तुडूंब गर्दी. माणसं हळहळली. जुन्या आठवणी काढू लागली. काही वेळाने तिरडीवर बांधलेल्या भाऊ बामणाचं प्रेत गावानं उचललं. रडायला जवळचं कोणी आलंच नाही. गावाचा शेवटचा बामण स्मशानात जळून राख झाला. एक वटवृक्ष कायमचा उन्मळून पडला...  

... डोक्यात नुसता प्रश्नांचा भडीमार. काळासोबत जे बामण गावगाडा सोडून शहराकडे वळाले ते स्थिरस्थावर झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्याचं घडलंही असेल आयुष्य? त्यांच्या पुढच्या पिढ्या शिकून गेल्याही असतील देश-विदेशात? भलेही त्यांनी मोठमोठे प्रबंध लिहिले असतीलही. पण त्यात भाऊ बामणासारख्यांना किती स्थान? मंडळी, गावासोबत गावकीला जोडून घेत जे गावगाड्यातल्या प्रथा परंपरा जपत राहिले त्या भाऊ बामणासारख्यांची नेमकी नोंद तरी कुठे? भले नव्या जागतिकीकरणात त्यांनी केलेल्या पूजा अर्चा, होमहवन निव्वळ अंधश्रद्धाही ठरतील? पण त्यांनी ज्या निष्ठेने त्या श्रद्धा जपल्या असतील त्याचं काय? 
आयुष्यभर भाऊ बामणानं साऱ्या गावाचे विधी पार पाडले असतील. कित्येकांच्या नावाने पिंड तयार केले असतील. कित्येकांचे चौदावे पार पाडले असतील. पण त्याच्याच मृत्यूनंतर त्याचा स्वतःचा विधी करायला गावाला बामण उरलाच कुठे? अख्ख्या गावाच्या मंडवळ्या भाऊ बामणानं बांधल्या असतील पण स्वतःच्या लेका-सुनाच्या मंडवळ्या बांधण्याचं भाग्य त्याच्या नशिबी आलंच कुठे? मंडळी, हे त्याचं भाग्य म्हणायचं की दुर्भाग्य? मरून जाण्याआधी स्वतःच्या जमिनीची आणि घरादाराची मालकी त्याने पोराच्या नावावर करण्या ऐवजी गावाच्या मंदिर ट्रस्टीच्या नावे का केली असेल? आयुष्यभर त्याने कित्येकांच्या घरात शांततेचे होम पटवले असतील. तितकेच मंत्र म्हटले असतील. पण त्याच्या घरात शांतता नांदायला आलीच कुठे?

शेवटी, गावात आता पहाटेच्या वेळी “ठणsss ठणsss” वाजणारी घंटा नेहमीसारखी वाजत नसेल तेव्हा गावाला आणि मंदिरातल्या देवाला चुकल्या-चुकल्यासारखं वाटत असेल का? नव्या काळात पूजा आरत्या, होमहवन, पिंडदान हे सगळं कालबाह्य होईलही. पण हे सारं प्रामाणिकपणे आणि ज्या निष्ठेने त्यानं गावकीसाठी केलं म्हणून निदान त्याच्या आठवणी तरी कुणाच्या काळजात मागे उरतील का? की ऊठ सूठ आजूबाजूला बामणांना खच्चून शिव्या घालायच्या या नव्या जमान्यात तुम्हीही म्हणाल, “साला एक बामण मेलं म्हणून काय बिघडलं? देशात चिक्कार गर्दी बामणांची... !”

अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी