एमएच-नर्सिंग-सीईटी-२०२४ नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ
बीड (प्रतिनिधी) - एमएच-नर्सिंग-सीईटी-२०२४ नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक विद्यार्थी दिनांक १५ मार्च २०२४ पर्यंत आपल्या नावाची नोंद करू शकतात. अशी माहिती आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई कडून काढण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आल्याची माहिती मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, एमएच-नर्सिंग-सीईटी-२०२४ च्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय काल दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आला. यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नोंदणी प्रक्रिया ही दिनांक ०९ ते २९ फेब्रुवारी २०२४ अशी चालणार होती मात्र आता ०१ ते १५ मार्च २०२४ अशी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणून आता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रथम वर्ष बी.एस्सी. नर्सिंग, सहाय्यक परिचर्या प्रसाविका (ए.एन.एम.) व सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जी.एन.एम.) या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थी येत्या १५ मार्च २०२४ पर्यंत नाव नोंदणी करू शकतात. तत्पूर्वी विद्यार्थी व पालकांकडून सीईटी अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन एमएच-नर्सिंग-सीईटी-२०२४ च्या नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करून आपले प्रवेश निश्चित करू शकतात. असे पत्रक आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी काल दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी काढले असून इच्छुक विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीकरिता http://www.mahacet.org ही वेबसाईट देण्यात आली असून cetcell@mahacet.org हा ई-मेल आयडी देण्यात आला आहे. अशी माहिती मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
Comments
Post a Comment