बीडमध्ये पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटला
पेपर फुटी मागे बीडची मोठी टोळी, त्यांच्या मागे कोणाची सत्ता पोलिसांनी शोधावे अन्यथा सेना स्टाईल आंदोलन केले जाईल -जिल्हाप्रमुख गणेश वरेकर
बीड प्रतिनिधी
बीड येथील नगर रोडवर चऱ्हाटा फाटा येथील स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर्स या परीक्षा सेंटरवर पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फोडणारा सराईत गुन्हेगार रंगेहात अटक झाला आहे.या आरोपीवर यापूर्वी पेपर फोडीचे अनेक गुन्हे दाखल असताना तो पुन्हा या परीक्षेला कसा बसला ? या पेपर फुटी मागे बीड मधील एक मोठी टोळी कार्यरत असून त्यांच्या मागे कोणाच्या सत्तेची ताकद आहे हे उघड झाले पाहिजे. या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करून अटक करावी आणि अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला आहे.
बीड येथील स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर्स चराटा फाटा नगर रोड बीड या परीक्षा सेंटरवर बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा होती.या परीक्षा सेंटरवर पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर सोडवणाऱ्या परीक्षार्थी लहू मच्छिंद्र काळे याने बटन गुंडी कॅमेरा द्वारे पेपर फोडला. अत्याधुनिक यंत्राचा वापर करून पेपर बाहेर गेला. बाहेर त्या विषयाचे तज्ञ शिक्षक तयारच बसलेले होते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या विद्यार्थ्याला अत्याधुनिक साहित्याद्वारे भ्रमणध्वनीवरून कानी पडत होते. कानाच्या आत अगदी बारीक सुपारी पेक्षाही लहान हेडफोन बसवलेला होता. तो हेडफोन आहे असे कोणाच्याही लक्षात येत नाही. त्याचा आवाज सुद्धा बाहेर येत नाही. मात्र ऐकणाऱ्याला ऐकू येते. त्याची रिंग वाजत नाही. शांत ऐकून विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे लिहीत होता. मात्र त्याच्या हालचालीवरून परीक्षा सेंटर वरील परीक्षकाला शंका आल्याने त्याने कसून तपास केला असता त्याच्याकडे अत्याधुनिक साहित्य सापडले. एवढेच नव्हे तर त्याने पेपर हॉलमधून बाहेर पाठवल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला तात्काळ बाजूला घेण्यात आले. पोलिसांना बोलवण्यात आले. घटना सकाळी घडली मात्र रात्री उशिरापर्यंत त्या विद्यार्थ्यावर बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाऊ नये म्हणून बीड मधील एक मोठी टोळी क्रियाशील होती. ही बाब जेव्हा शिवसेनेला कळाली तेव्हा शिवसेनेने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक यांना घटनेचे गांभीर्य सांगून या घटनेतील आरोपींना माफ करू नका, ज्याने पेपर फोडला आहे त्याच्यावर तर गुन्हा दाखल करून अटक केलीच पाहिजे. मात्र त्यांच्या मागे असणारे खरे गुन्हेगार देखील पोलिसांनी समोर आणले पाहिजेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही या प्रकरणाचा छडा लावू असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment