लोकशाही प्रबळ होण्यासाठी मतदान प्रक्रिया आवश्यक - प्रमोद कुदळे
पाटोदा (गणेश शेवाळे) लोकशाही शासनप्रणाली अधिक प्रबळ होण्यासाठी मतदार नोंदणी व मतदान प्रक्रिया आवश्यक आहेत म्हणून वयाची १८ वर्षे पूर्ण करण्याऱ्या प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे प्रतिपादन पाटोद्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.तहसील कार्यालय निवडणूक विभाग आणि महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व मतदार नोंदणी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. व्यासपीठावर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार संतोष बन,नायब तहसिलदार निवडणूक जालिंदर दोडके, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र सुळे,उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. काकासाहेब पोकळे यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य आबासाहेब हांगे म्हणाले की, युवा मतदार प्रत्यक्ष मतदानात सहभागी होत नाहीत याउलट अनेक वृद्ध मतदार मतदानाचा हक्क काटेकोरपणे बजावतात. कमी टक्के मतदान झाल्यामुळे अनेकदा अशिक्षित व अयोग्य उमदेवार निवडून दिले जातात म्हणून जास्तीत जास्त मतदार नोंदणी होऊन मतदान होणे गरजेचे आहे.
यानंतर मतदार जागृतीची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली व उपस्थित पात्र विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी आवेदनपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. काकासाहेब पोकळे यांनी केले. आभार ग्रंथपाल प्रा. जगन्नाथ पटाईत यांनी मानले. कार्यक्रमास नवमतदार विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
Comments
Post a Comment