एन.सी.सी.चे विद्यार्थी कॅडेट्स मिळालेल्या चेकने बेजार
गेल्या वेळी चेकची रक्कम बुडाली;यावेळीही बुडण्याच्या मार्गावर
(बीड प्रतिनिधी) - शहरातील एनसीसी असलेल्या माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी ज्यांनी एनसीसी मध्ये भाग घेतला होता. त्या कॅडेट्सना सन २०२१-२२ मध्ये आठवीत असताना तर सन २०२२-२३ मध्ये नववीत असताना सहभाग भत्ता म्हणून एनसीसी कडून आलेल्या रकमचे शाळांकडून चेक देण्यात आले. मात्र यातील अनेक विद्यार्थ्यांची रक्कम गेल्या वर्षी बुडाली असून यावेळीही बुडण्याच्या मार्गावर आहे. तरी संबंधित शाळा व्यवस्थापन व एन.सी.सी. चे संबंधित अधिकारी किंवा व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देऊन एनसीसीच्या कॅडेट्स विद्यार्थ्यांची गेल्या वर्षा सहित यावेळचीही रक्कम अदा करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, काही वर्षांपूर्वी इयत्ता आठवी व नववीत एनसीसी घेतलेल्या विद्यार्थी कॅडेट्सना सहभाग भत्ता म्हणून एनसीसी कडून काही रक्कम दिली जायची. ती शाळेमार्फत देण्यात येत होती. मात्र त्यात काहींनी अपहार केल्याने आता एनसीसी कडून देण्यात येणारी रक्कम येते शाळेच्या बँक अकाउंट वर परंतु आलेली रक्कम ही रोख स्वरूपात न देता शाळा व्यवस्थापन त्या ऐवजी संबंधित विद्यार्थ्यांच्या नावे चेक देते आणि इथेच विद्यार्थी व त्याच्या पालकाची बेजारी सुरू होते. शाळेकडून विद्यार्थ्याला देण्यात आलेला चेक त्याच्याकडून राष्ट्रीयकृत बँक स्वीकारत नाही. कारण राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय किमान १८ पूर्ण होणे आवश्यक असल्याची अट आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघळल्या जात नाही आणि चेक विद्यार्थ्यांच्या नावाने असल्याने तो त्याच्या पालकाच्या बँक खात्यावर ही जमा करता येत नाही. अशा अवस्थेत पालकासहित त्याचे संयुक्त खाते उघडले जाऊ शकते परंतु तो १८ वर्षाचा झाल्यानंतर हे संयुक्त खाते सुद्धा त्याच्या उपयोगाचे राहत नाही. त्याला पुढे चालून ते खाते एकट्याच्या नावाने करावेच लागते. पुन्हा त्यासाठी वेगळ्या प्रक्रियेतून जावेच लागते. शिवाय पालकासोबत संयुक्त खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत किमान २००० रुपये लागतात आणि एनसीसी कडून मिळालेली भत्त्याची रक्कम ही खाते उघडायला लागत असलेल्या रकमेपेक्षा अर्धीच असते. अशा अवस्थेत हे संयुक्त खाते उघडण्यासाठी पालक तयार होत नाहीत. तर पोस्टमध्ये विद्यार्थ्यांचे खाते ५०० रुपयात उघडले जाते परंतु तिथे विद्यार्थ्यांच्या नावे आलेला चेक स्वीकारला जात नाही. यामुळे पोस्ट मध्ये खाते उघडूनही विद्यार्थी तिथे चेक जमा करू शकत नाही. यामुळे सन २०२१-२२ साली एनसीसी मध्ये असलेले आठवीतील विद्यार्थी कॅडेट्सना मिळालेल्या प्रत्येकी ३४९ रुपयांचे चेक त्यांना रक्कम न मिळताच बुडाले तर यंदाही सन २०२२-२३ मध्ये इयत्ता नववीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या महिन्यात एनसीसी कडून आलेल्या भत्त्याच्या रकमेचे शाळा व्यवस्थापनाने रोख रक्कम न देता पुन्हा चेकच दिले. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थी कॅडेट्सना देण्यात आलेले हे चेक प्रत्येकी ११३० रुपयांचे आहेत. ते चेक ३ महिन्याच्या आत बँकेत जमा करणे आवश्यक आहे. मात्र इथेही अडचण आहे. एनसीसीच्या ज्या विद्यार्थी कॅडेट्स ना यंदा प्रत्येकी ११३० रुपयांचे चेक मिळाले आहेत ते सर्व विद्यार्थी सध्या १५ ते १६ वर्षा दरम्यान वय असलेले आहेत. यामुळे त्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत काही उघडले जात नाही. पोस्टमध्ये उघडले जाते तर तिथे चेक स्वीकारला जात नाही. अशा अवस्थेमुळे हे चेक येऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. आता उरलेल्या एक महिन्यात एनसीसीच्या या विद्यार्थी कॅडेट्सना यावर्षीचे ११३० आणि गेल्या वर्षीचे ३४९ असे प्रत्येक विद्यार्थ्याचे १४७९ रुपये एनसीसी आणि संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून प्रत्येक एनसीसी विद्यार्थी कॅडेट्सना अदा करण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
Comments
Post a Comment