या जगण्यावर शतदा प्रेम करावे कार्यक्रमातून ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू आणल्याचा आनंद

-अ.भा. नाट्यपरिषद परिषदेच्या अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर यांचे प्रतिपादन
-बीडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमास जिल्हाभरातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद

बीड (प्रतिनिधी)
दि.२७ : मागील ६ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यातील कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जीवनातील काही क्षण आनंदात घालवले. या जगण्यावर शतदा प्रेम करावे कार्यक्रमातून ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू आणल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्यपरिषद परिषदेच्या अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची बीड शाखा आणि सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने बीडमध्ये केएसके महाविद्यालयात ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.२७) करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून डॉ.दिपाताई क्षीरसागर या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटक नवगण शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे होते. याप्रसंगी के. एस.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, ॲड.अनंतराव जगतकर (अंबाजोगाई), के.एस.के. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय पाटील, प्रो. डॉ. दुष्यंता रामटेके , नगरसेवक गणेश वाघमारे, गौतम मस्के, सूर्यकांत महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.दिपाताई क्षीरसागर म्हणाल्या की, नाट्यपरिषदेच्या माध्यमातून नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील मागील सात वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनामध्ये थोडा आनंद निर्माण व्हावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना जे छंद तरुण वयात असताना जोपासता आले नाहीत ते आता जेष्ठ नागरिक झाल्यानंतर पूर्ण करता याव्यात. लहान मुलांचे, तरुणांचे कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र ज्येष्ठांचे कार्यक्रम कोणी आयोजित करत नाहीत म्हणून आम्ही मागील सात वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करतो. आपला हा कार्यक्रम आता बीड तालुक्यातील नव्हे तर बीड जिल्ह्यात पोहचला आहे. नाट्यशास्त्र विभागाच्या प्रोफेसर डॉ. दुष्यंता रामटेके ह्या मेहनत घेऊन पूर्ण क्रयमच दिगदर्शन आणि संयोजन करतात .अनेक तालुक्यातून ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात बीडसह इतर तालुक्यातून देखील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाल्याने आनंद वाटला असल्याचे सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात साई नृत्यालय येथील मुलींनी नटराजनचे पूजन करून केली. शारदा भजनी मंडळाने उत्कृष्ट भारुड सादर केले. दुर्गा भजनी मंडळाने गवळण, जिनियस वूमन्स ग्रुपने पैठणी फॅशन शो सादर केला. वैशाली नहार आणि संगीता कोठारी यांनी अतिशय जिवंत अभिनय सादर करत ज्येष्ठांची व्यथा मांडणारी नाटिका सादर केली. यामध्ये श्रद्धा कोठारी आणि सौरव जैन यांनी त्यांची साथ दिली. ही नाटिका पाहताना उपस्थित जेष्ठ नागरिक आणि प्रेक्षकांना डोळ्यात अश्रू अनावर झाले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी सुंदर गीत सादर केले. त्यांच्या गीतावर ज्येष्ठ नागरिकांनी ठेका धरला. यावेळी त्यांना नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. तसेच सुनीता केंडे , शेख मजहर, स्वयंप्रकाश खडके, विजेंद्र सरकटे, लता कोकीळ यांच्या गीत गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. शकुंतला रामटेके यांनी 'मी वृक्ष बोलतोय' ही नाटिका जेष्ठांची समस्या मांडणारी सादर केली. केंद्रे सर यांनी कविता तर तळवळकर यांनी 'प्रेमावर बोलू काही' यावर काव्यवाचन केले. संगीता कोठारी यांचा 'शांताबाई' या गीतावरील नृत्य भाव खाऊन गेला. यासह अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. डॉ.दीपा ताई क्षीरसागर यांच्या हस्ते सहभागी झालेल्या जेष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन आणि बहारदार सुत्रसंचलन डॉ. दुष्यंता रामटेके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीत विभागातील डॉ.सुरेखा जोशी, प्रा.दिपक जमदाडे, प्रा.सुरेश थोरात, प्रा.विजय कुमार राख, प्रा.इंद्रजित, प्रा.सुतार पी. आर. प्रा. सोनाली गवारे आणि प्रा. शेख अमजद यांनी परिश्रम घेतले.

चौकट
ज्येष्ठ नागरिकांनी हसतमुखाने आनंदात
जीवन जगावे-डॉ.भारतभूषण क्षीरसागर
कार्यक्रमाचे उद्घाटक नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या जेष्ठ नागरिकांना आपले आयुष्य हसत आणि आनंदात जगण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

चौकट
जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम नावीन्यपूर्ण-ॲड.अनंतराव जगतकर
प्रमुख पाहुणे ॲड.अनंतराव जगतकर यांच्यासोबत अंबाजोगाई येथून १५ जेष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला सादर केली. यावेळी ॲड.अनंतराव जगतकर बोलताना म्हणाले की, मला या कार्यक्रमाची माहिती वृत्तपत्राद्वारे मिळाली. या कार्यक्रमाची बातमी वाचूनच मी प्रोत्साहित झालो आणि अंबाजोगाईवरून बीडला या कार्यक्रमासाठी सहकाऱ्यासोबत आलो. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम हा नावीन्यपूर्ण आहे. अशा कार्यक्रमातून विरंगुळा मिळतो. जेष्ठ नागरिकांनी आयुष्यातील काही क्षण हे आनंदात जावो यासाठी त्यांनी अशा कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. आपल्या तालुक्यात देखील डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे देखील ॲड.अनंतराव जगतकर यांनी सांगितले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी