असंघटित क्षेत्रातील मजुरांना न्याय देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज उभा करू- कडुदास कांबळे
गेवराई (प्रतिनिधी) दि. 1 जानेवारी 24 - ग्रामीण आणि शहरी भागातील वीटभट्टी मजूर, बांधकाम मजूर, शेतमजूर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही कार्यकर्ते घडवत आहोत. असंघटित क्षेत्रातील मजुरांना न्याय देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आम्ही उभा करत आहोत असे प्रतिपादन गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते कडुदास कांबळे यांनी मादळमोही येथील ॲक्शन एड संस्थेच्या वतीने दि. 31 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या "असंघटित क्षेत्रातील कामगारांचे अधिकार" या विषयावर बोलताना मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मादळमोही येथील सामाजिक कार्यकर्ते शेख सिराज आणि ग्रामपंचायत सदस्य आदिल पठाण उपस्थित होते. या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामध्ये शेख सिराज आणि आदिल पठाण यांनीही त्यांचे विचार मांडले.
मादळमोही येथे 31 डिसेंबर 2023 रोजी असंघटित कामगारांच्या अधिकारासंदर्भात आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना कडूदास कांबळे पुढे म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी भागातील कामगारांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. सध्याच्या जातीपातीच्या राजकारणामुळे इथल्या शोषित घटकांच्या प्रश्नावर बोलताना कोणी दिसत नाही हे दुर्दैव आहे. म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन या उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आम्ही उभा करत आहोत. शासनाच्या योजना कितीही चांगले असल्या तरी संघटित ताकतीशिवाय त्या मिळू शकत नाहीत. तेव्हा गाव पातळीवरील असंघटित कामगार क्षेत्रातील कामगारांनी एकीचं बळ निर्माण केलं पाहिजे असेही यावेळी त्यांनी बोलताना मत मांडले.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक क्रांती महिला असंघटित कामगार युनियनच्या अध्यक्ष शाहीन पठाण यांनी केले तर सूत्रसंचालन मंगलताई पवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविताताई डोंगरे, तुकाराम खरात, वहिदा अहमद, मनीषा शरणांगत, रोहिणी राऊत, आकांक्षा घाटूळ, शकुंतला घुंगासे, मंदाकिनी चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी मादळमोही आणि सिरसदेवी सर्कलमधील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कविताताई डोंगरे यांनी मानले.
Comments
Post a Comment