बांधखडक शिक्षणोत्सव' हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल-गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
पाचदिवसीय शिक्षणोत्सवात दिग्गज कवी /लेखक /वक्ते /उपक्रमशील शिक्षकांचे लाभले मार्गदर्शन--
लेझीम पथक /आनंदनगरी /चित्रप्रदर्शन / सांस्कृतिक कार्यक्रम ठरले लक्ष्यवेधी
बांधखडकसह वनवेवस्ती /चव्हाणवस्ती येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) :
जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेतून जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथे दि.२१ते २५ नोव्हेंबर २०२३ या काळात संपन्न झालेल्या बांधखडक , वनवेवस्ती व चव्हाणवस्ती या नायगाव केंद्रातील तीन शाळांचा संयुक्त 'शिक्षणोत्सव' हा सहशालेय उपक्रम यशस्वी व अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरला .
शनिवार दि.२५नोव्हेंबर २०२३ रोजी गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या अध्यक्षतेखाली या शिक्षणोत्सवाचा समारोप झाला .अध्यक्षीय मनोगतात आदरणीय धनवे साहेबांनी तीनही शाळांतील शिक्षक , विद्यार्थी , ग्रामस्थ व विशेषत: बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिला या सर्वांचे भरभरून कौतुक केले . केवळ घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नसून प्रत्येक विद्यार्थ्यातील सूप्त कला , क्रीडा / साहित्यिक मूल्य ओळखून त्यांचा विकास करत संस्कारी पिढी घडविणे व त्यासाठी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवणे हे खरे शिक्षण आहे . या शिक्षणोत्सवात कविसंमेलनातून मुलांना पाठ्यपुस्तकातील कविंना प्रत्यक्ष अनुभवता आले . दिग्गज कथाकारांच्या तोंडून दर्जेदार कथा सादरीकरणाचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले , व्याख्यानांच्या माध्यमातून महापुरूष व प्रेरणादायी व्यक्तिंची चरित्रे ऐकता आली , सांस्कृतिक कार्यक्रमातून कलाविष्कारांचे दर्शन घडविता आले , बाल आनंद मेळावा (आनंदनगरी) अर्थात खाद्यपदार्थ , स्टेशनरी , भाजीपाला , फळे ,किराणा यांच्या विक्रीतून व्यवहारज्ञान मिळाले . सुलेखन (सुंदर हस्ताक्षर )कार्यशाळेतून हस्ताक्षरे सुधारली ,कार्यानुभव अंतर्गत कृतीसत्रातून टाकावू वस्तूतूनदेखील सौंदर्य फुलविता येते याचे ज्ञान व संस्कार मिळाले . या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा शिक्षणोत्सव राज्याला दिशा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरेल असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांनी या प्रसंगी काढले .
समारोप समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री. केशव गायकवाड , केंद्रप्रमुख नारायण राऊत व किसन वराट , धामणगाव शाळेचे मुख्या.वाणी सर , जामखेड ऊर्दू शाळेचे शाकीर सर उपस्थित होते , शिक्षणोत्सव काळात अनेक ज्येष्ठ व उपक्रमशील शिक्षक बांधवांनी सदीच्छा भेट देऊन मार्गदर्शन व सहकार्य केले .
समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांधखडक शाळेचे मुख्या.श्री.विकास सौने यांनी केले , ईशस्तवन व स्वागतगीताचे गायन माता पालक संघाच्या सदस्या सौ.रूपाली अरविंद घोडके यांनी अत्यंत सुरेल आवाजात केले , शिक्षणोत्सवातील अनुभव' या विषयावर कु.अंकिता उद्धव खाडे(चव्हाणवस्ती शाळा) व चि.सोहम गणेश पवार (वनवेवस्ती शाळा) यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तर ,श्री.मंगेश वारे व सौ.अर्चना विजय वारे यांनी पालक प्रतिनिधी(बांधखडक शाळा) म्हणून मनोगत व्यक्त केले . शिक्षक प्रतिनिधी म्हणून वनवेवस्ती शाळेचे मुख्या.श्री.नितीन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले , तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर इनामदार यांनी केले .
या कार्यक्रमात बांधखडकच्या सुपुत्री कु. ताई शांतीलाल वारे यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन खूपच लक्ष्यवेधी ठरले.स्वत:ला joint pain (arthritis)चा दुर्धर आजार असतानादेखील त्यांनी आपल्यातील दिव्य व अलौकीक प्रतिभेच्या मदतीने साकारलेली चित्रे सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला , गटशिक्षणाधिकारी धनवे साहेबांनी 'गुणग्राहकता व संवेदनशीलता' यांचे दर्शन घडवत स्वतः व्यासपीठावरून उतरत जागेवर जाऊन केलेल्या या भूमीकन्येच्या सत्काराने उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले . लेझीम पथकातील बालकांनी अप्रतिम लेझीम नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकली . तत्पूर्वी दि.२४नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० ते दु.२:०० यावेळेत रक्तदान शिबिर संपन्न झाले . ज्यास स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला , तर रात्री ८:०० वा.झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीगणेशवंदना , वारकरी दिंडी , नृत्य , गोंधळगीत , फनी सॉंग , देशभक्तीपर गीत , राजा शिवछत्रपती हे कार्यक्रम शेकडो शिक्षणप्रेमी व कलारसिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले .यावेळी ग्रामस्थांनी प्रत्येक गीताला बक्षिसांचा वर्षाव करत 'लाखमोलाचे' भरीव योगदान दिले .
या संपूर्ण शिक्षणोत्सवाची संकल्पना बांधखडक शाळेचे ज्येष्ठ व उपक्रमशील शिक्षक श्री.मनोहर इनामदार यांची असून श्री. विकास सौने(बांधखडक शाळा),श्री.नितीन जाधव व श्री प्रविण शिंदे(वनवेवस्ती शाळा),श्री.बाबा चव्हाण व श्री.प्रमोद कचरे (चव्हाणवस्ती शाळा) या सर्व शिक्षकांनी व तीनही शाळांतील सर्व पालक ,ग्रामस्थ ,महिला तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच सर्व सदस्य या सर्वांनी पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न व सर्वतोपरी सहकार्य केले . जि.प.अहमदनगरच्या 'मिशन आपुलकी' या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून तब्बल पाचही दिवस अविरत प्रयत्न करून हा शिक्षणोत्सव यशस्वी व ऐतिहासिक केल्याबद्दल बांधखडकसह / वनवेवस्ती /चव्हाणवस्ती या तीनही शाळांतील सर्व विद्यार्थी , शिक्षक , पालक व ग्रामस्थांवर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे .
Comments
Post a Comment