भगवान महाविद्यालयाच्या खेळाडूंची विविध खेळांमध्ये नेत्रदीपक कामगिरी


 आष्टी ( प़तिनिधी --गोरख मोरे ) : 
  मागील पंधरा दिवसांमध्ये मराठवाडय़ातील विविध शहरांमध्ये पार पडलेल्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये येथील भगवान महाविद्यालयाच्या (कनिष्ठ व वरिष्ठ) खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेत्र दीपक असे यश मिळवले.
   खरपुडी (तालुका-जिल्हा जालना) या ठिकाणी १० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या मल्लखांब स्पर्धेमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका डोके हिने विभागीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
     कनिष्ठ महाविद्यालयातीलच १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या ३००० मीटर मैदानी स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा विकास गर्जे या खेळाडूने सैनिकी विद्यालय बीड येथे ११ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
    कनिष्ठ महाविद्यालयातील १७ वर्षे वयोगट मुलींच्या 'सेपाक टकारा' या क्रीडा प्रकारामध्ये सेलू (जिल्हा परभणी) या ठिकाणी २१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विभागीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. मुलींच्या या संघाने संभाजीनगर ग्रामीण, संभाजीनगर मनपा आणि परभणीच्या संघावर एकतर्फी विजय मिळवून ही कामगिरी साकारली. या संघातील खेळाडूंची नावे अशी आहेत- शेख बुशरा, माधुरी नरवडे, बालाबाई पाचपुते, रोहिणी आढाव व साक्षी खंदारे. या खेळाडूंना श्री संजय सोले सर यांचे मार्गदर्शन लाभले.
  आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) या ठिकाणी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये ६५ किलो वजनी गटांमध्ये साहिल सय्यद व ९७ किलो वजनी गटांमध्ये विकास तावरे या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्हीही कुस्तीपटूंची आंतर विद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्यावतीने खोकरमोह या ठिकाणी २२ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये ९२ किलो वजनी गटातून गादी विभागात विकास तावरे, तर माती विभागातून ५७ किलो वजनी गटात विश्वास तावरे आणि ७४ किलो वजनी गटातून अमोल दिंडे या खेळाडूंची निवड झाली आहे. हे खेळाडू महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या कुस्तीपटूंना महाराष्ट्र केसरी सईद भाऊ चाऊस यांचे मार्गदर्शन लाभले .
 या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख व संघ व्यवस्थापक डॉ. दीपक टेकाडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सूर्यकांत धोंडे व प्रा.बापू तोरडमल यांचे सहकार्य लाभले .
  या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष क्रीडाप्रेमी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य, उपप्राचार्य डॉ. आप्पाराव टाळके, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. दीपक टेकाडे, प्रा. श्रीकांत धोंडे, डॉ. दिगंबर पाटील, डॉ. अनिल हजारे, प्रा. अजहर शेख, प्रा. जफर शेख, प्रा.ज्ञानदेव गाडे,प्रा. जयश्री बोडखे मॅडम, प्रा. राजश्री सोनवणे मॅडम, प्रा.सचिन वाळके, पप्पू गोरे, प्रा. राजू पाचे हे उपस्थित होते .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी