कलाध्यापक उध्दवराव विभूते व श्रीरंग राठोड यांचा सेवागौरव समारंभ संपन्न

शिक्षणातूनच देश परमोच्च शिखरावर पोहोचू शकतो - वसंतराव देशमुख गुरुजी


कलाध्यापक उध्दवराव विभूते व श्रीरंग राठोड यांचा सेवागौरव समारंभ संपन्न

माजलगाव- येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील कलाध्यापक उध्दवराव विभूते गुरुजी व सहशिक्षक श्रीरंग राठोड गुरुजी हे आज शासकीय नियमानुसार सेवा निवृत्त झाले असून त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा सेवा गौरव समारंभ संपन्न झाला. 
    या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती, भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे पुर्व कार्यवाह वसंतराव देशमुख गुरुजी , प्रमुख अतिथि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अमरनाथ खुर्पे तसेच व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राम कुलकर्णी, प्रकाश दुगड, विष्णुपंत कुलकर्णी , सत्कार मुर्ती श्री व सौ गीता उध्दवराव विभूते गुरुजी व श्रीरंग राठोड आदि उपस्थित होते.
     यावेळी संस्थेच्या वतीने श्री व सौ गीता उध्दवराव विभूते व श्रीरंग राठोड यांचा संपूर्ण आहेर देऊन व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव करण्यात आले. माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने भेट वस्तु देऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, सदाशिव ढगे, सुर्यकांत उजगरे , कमलाकर झोडगे , शिक्षक प्रतिनिधि रामेश्वर कुंभार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कलाध्यापक उध्दवराव विभूते गुरुजी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली. 
    यानंतर शिक्षकांपैकी रवींद्र खोडवे आणि रोहित खिंडरे, पंडित मेंडके यांनी श्रीरंग राठोड गुरुजी व उध्दवराव विभूते गुरुजी यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार मुर्ती च्या नातेवाईकांपैकी गंगाधर राठोड ,अजय विभूते, शिवाजी गातवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
   सत्काराला उत्तर देताना सत्कार मुर्ती श्रीरंग राठोड गुरुजी यांनी श्री सिध्देश्वर विद्यालयात सेवा करताना आलेल्या अविस्मरणीय अनुभवांच्या क्षणांचा उल्लेख करत, संस्थेतील पारिवारिक भावनेमुळे व मिळालेल्या संस्कारामुळे माझी जडणघडण झाली असे सांगितले. यानंतर दुसरे सत्कार मुर्ती उध्दवराव विभूते गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी दशेपासून नियुक्ति ते निवृत्ती पर्यंत विद्यार्थी म्हणून आणि नंतर कलाध्यापक म्हणून संस्थेने विश्वासानेे दिलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडताना आदरणीय वसंतराव देशमुख गुरुजी, घेवारे गुरुजी तसेच संस्था पदाधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत राहिले. त्यातूनच माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली आहे. यानंतर मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर यांनी आपल्या मनोगतातून कलाध्यापक उध्दवराव विभूते गुरुजी व श्रीरंग राठोड गुरुजी यांचा आदर्श नवोदित शिक्षकांनी घ्यावा तसेच सेवा निवृत्तीनंतर राठोड गुरुजी व विभूते गुरुजी यांना आरोग्य पूर्ण दिर्घायु लाभो अशा शुभेच्छा दिल्या. 
   या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना आदरणीय वसंतराव देशमुख गुरुजी यांनी सांगितले की, शिक्षणातूनच देशाचा सर्वांगीण विकास होऊन भारत महासत्ता होईल. ही जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांनी निवृत्त होत असले तरी आपली मानसिकता निवृत्त होऊ देऊ नये. याचा परिणाम प्रकृतीवर होतो, शरीरात शक्ति नसेल तर मनात शक्ति असेल, मनात नसेल तर बुध्दित शक्ति निश्चित असेल याचा उपयोग सतत कार्यासाठी केला पाहिजे आपण निवृत्ती नंतर काहीही करायचे नाही मला पेंशन आहे ही मानसिकता आधी बदलली पाहिजे. सातत्याला जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे ,सातत्य म्हणजे काय असते हे कला विभागाच्या चित्रमंजिरी अंका मधून शिकावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे यांनी केले. आभार पर्यवेक्षक कमलाकर झोडगे यांनी मानले. सुत्रसंचालन श्रीमती सत्यभामा मोरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली शांती मंत्र विजयकुमार सोन्नर यांनी सांगितला. यावेळी ज्येष्ठ संस्था सभासद भिकचंदजी दुगड, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, स्थानिक संस्था सभासद प्रशांत भानप, श्रीरंग राठोड गुरुजी व उध्दवराव विभूते गुरुजी यांचे नातेवाईक, आप्तेष्ठ, मित्र, शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शाळेचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, सदाशिव ढगे, सुर्यकांत उजगरे, कमलाकर झोडगे, कार्यालय प्रमुख संतोष लवडकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी