कंत्राटी सफाई व इतर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन. - भाई गौतम आगळे.
परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्त कंत्राटदार सफाई व इतर कंत्राटी कामगारांना त्यांच्या मुलभूत हक्का पासून वंचित ठेवले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे रास्ता रोको आंदोलना चे आयोजन केले आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, तर दुसरीकडे कंत्राटी कामगारांना किमान वेतनासाठी मागील १० वर्षांपासून लढा द्यावा लागत आहे. ही जिल्हा प्रशासनासाठी अतिशय लाजीरवाणी बाब आहे. असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
सविस्तर व्रत असे की कंत्राटी सफाई व इतर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रोजंदारी मजदुर सेनेच्या बॅनरखाली २८ सप्टेंबर २०१३ ला नगरपरिषद परळी वैजनाथ येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाबू भाई भालाधरे, काॅम.मनोज रानडे यांचे प्रतिनिधी सुनील घागरे मुंबई यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून न्याय मिळेपर्यंत धरणे व निदर्शने आंदोलन सुरू करून त्या वेळी रस्त्यावर काळी दिवाळी साजरी करून कंत्राटी सफाई व इतर कामगाराचां लढा उभा केला होता. आज संपूर्ण जिल्ह्यात कंत्राटी कामगारांची एका जुटीने संघटन झाले. त्या मुळे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड समोर २८ नोव्हेंबर २०१६ ते २६ जानेवारी २०२३ पर्यंत अनेक निवेदन देऊन प्रसंगी लोकशाही पद्धतीने आंदोलन संपन्न केली. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठका घेऊन इतिवृत्त तयार करुन जिल्हायातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना पाठवले. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्या मुळे वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, जिल्हा अध्यक्ष (पूर्व ) शैलेश भाऊ कांबळे, (पश्चिम ) जिल्हा अध्यक्ष उद्धव भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
यातील प्रमुख मागण्या: नगरपरिषद बीड सफाई व इतर कंत्राटी कामगारांना पूर्ववत नौकरीच्या व पगाराच्या सलगतेसह तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे, महाराष्ट्र शासनाने किमान वेतन अधिसूचना २४ फेब्रुवारी २०१५ रोजी निर्गमित केली त्या प्रमाणे किमान वेतन देवून प्रत्यक्षात मिळालेला पगार या मधील फरक देण्यात यावा, मा. निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या आदेशानुसार मा. सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीड यांनी अभिप्राय सादर केला त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांनी मागील २२ वर्षांपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम १९५२ प्रमाणे कामगारांचा भविष्य निर्वाह निधी चा भरना केला तो किती जमा झाला आजतागायत माहिती दिली नाही, किंवा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सुद्धा अद्याप दिला नाही तो तात्काळ देण्यात यावा , बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद/नगरपंचायत मागील २२ वर्षांपासून किमान वेतन कायदा व अस्तित्वात असलेल्या प्रचलित कामगार कायदे, शासन परिपत्रक, शासन निर्णय , मा. न्यायालयाचे आदेश जिल्हाधिकारी बीड यांचे निर्देशाचे पालन करत नाहीत त्यांना तात्काळ निलंबित करुन त्यांची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ बडतर्फ करावे आदी मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात कंत्राटी कामगारांनी व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Comments
Post a Comment