इंग्रजी शाळेच्या वेळेवर आतातरी बंधन आणणार का नाही? आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
बीड(प्रतिनिधी) शाळेचा अतिताण असह्य झाल्याने बीडमध्ये एका विद्यार्थीनीला वर्गातच हृदय विकाराचा धक्का बसून त्यात तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने आपआपल्या शाळेच्या वेळा, विद्यार्थ्यांवर दफ्तरांचे होणारे ओझे, होमवर्क आदींवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या वेळा सकाळी 7ः45 ते दुपारी 2ः30 आहेत. म्हणजेच विद्यार्थी घरातून सकाळी सात वाजता बाहेर पडतात अन् साडेतीन वाजता घरी येतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेवर याचा परिणाम होत असून इंग्रजी शाळांनी आपल्या शाळेची वेळ शासन नियमानुसार करावी, अशी मागणी आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधाळे मुंडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी सुहास पाटील, नवनाथ प्रभाळे, सचिन कोटुळे आदी उपस्थित होते तर निवेदनावर सामजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांचीही स्वाक्षरी होती.
मनोज जाधव म्हणतात, सतत अभ्यास आणि व्यस्त दिनक्रमामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखली जात आहेत. यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत विद्यार्थी फक्त शाळा आणि ट्युशन यातच गुरफटलेले असतात. त्यानंतर होमवर्क वेगळा. यातून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या शारिरिक क्षमता त्यांना यासाठी साथ देत नाहीत. जिल्ह्यातील अनेक शाळा या शासनाने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ भरवल्या जातात. यामुळे विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी तीनपर्यंत घराच्या बाहेरच असतात. या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिक यांना वेळोवेळी निवेदनातून आणि इतर मार्गाने अवगत केले होते. परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. आज जो या विद्यार्थीनीचा जीव गेला याला जबाबदार कोण? असा प्रश्न जिल्हा भरात विचारला जात आहे. शिक्षणाची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारे शिक्षण विभाग याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसल्याने अशा घटना घडत आहेत. शिक्षण विभागाने वेळीच काही उपायोजना केल्या असत्या तर कदाचित या विद्यार्थिनीचा जीव वाचला असता. तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी शिकवण्या सुरू आहेत. या शिकवण्या रविवारी देखील परीक्षेच्या नावाखाली सुरू असतात. त्या रविवारी बंद ठेवण्यात याव्यात आणि मुलांच्या दप्तराचे ओझे हे देखील शासन नियमा नुसार ठेवावे. या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी मुधोळ यांना देण्यात आले.
*जनहित याचिका दाखल करणार*
शाळा व्यवस्थापन, जिल्हा परिषदेचे सीईओ, शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना शाळेच्या वेळेबाबत अनेकदा निवेदन देण्यात आलेले आहे. परंतु प्रशासनाने याबाबत काहीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रश्नावर जनहित याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती मनोज जाधव यांनी दिली आहे.
*पालक बेफिकीर*
आपला पाल्य शाळेत जितका जास्त वेळ राहील तितके पालक बिनघोर असतात. शाळेच्या कोंडवाड्यात आपल्या पाल्यांना कोंडून येण्यापेक्षा पालकांनी दिवसातून एखादा तास तरी आपल्या पाल्यांसोबत शाळेच्या विषयावर घालवायला हवा. परंतु असे होत नाही. आपल्या पाल्यांच्या बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी पालक हर तर्हेचे प्रयत्न करतात पण तेच पालक त्याच्या शारिरिक क्षमता वाढविण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे सात ते साडेसात तास शाळेत घालविण्याची पाल्यांची क्षमता नसते हे पालकांनी ओळखणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment