बीड नगर परिषद मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात असमर्थ - एस.एम.युसूफ़
पालकांनो,आपल्या मुला-मुलींना काठी चालविणे शिकवा;शाळेत जातानाही काठी देऊन पाठवा!
बीड नगर परिषद मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात असमर्थ - एस.एम.युसूफ़
बीड (प्रतिनिधी) - शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षणासाठी लहान मुले-मुली दररोज न चुकता घराबाहेर पडत आहेत. विद्यार्थ्यांवर मोकाट कुत्र्यांचे हल्ले होत आहेत. शहरात कुत्र्यांचा झालेला सुळसुळाट थांबविण्यास बीड नगर परिषद असमर्थ ठरल्याचा आरोप करत आता आपल्या लहान मुला-मुलींची काळजी पालकांनीच घ्यावी व त्यांना काठी चालविणे शिकवावे व शाळेत जाताना सुद्धा त्यांच्यासोबत काठी द्यावी. जेणेकरून मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यापासून ते स्वतःचा बचाव करू शकतील असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, काही महिन्यांपूर्वी बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून शहरात वाढलेल्या अफाट मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून शहरवासीयांना वाचविण्यासाठी कुत्र्यांना पकडून शहरातील बीड नगर पालिकेच्या बंद पडलेल्या कोंडवाळ्यात टाकून नसबंदी मोहीम राबवावी अशी मागणी केली होती तसेच याविषयी प्रसिद्धी माध्यमातून बातम्या सुद्धा प्रकाशित केल्या होत्या. याची दखल घेऊन विद्यमान मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी कुत्रे पकडण्यासाठी निविदा काढून त्याची जाहिरात प्रसिद्धी माध्यमात दिली. बस! एवढेच या निविदेनंतर याबाबतीत आजपर्यंत कुठलेही ठोस कार्य बीड नगर परिषद किंवा नीता अंधारे यांना करता आलेले नाही. शहरवासीयांना मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरभरातील कुठल्याही परिसरात लहान मुलांवर मोकाट कुत्री हल्ले करीत आहेत. यात अनेक मुले-मुली जखमी सुद्धा झाले आहेत. अशा घटनांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे फिरत आहेत. सुदैवाने कुत्र्यांच्या हल्ल्यात अजून कुणाचा मृत्यू झाला नाही परंतु अनपेक्षित व अप्रिय घटना कधीही घडू शकते. लहान मुला-मुलींना मोकाट कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करण्याकरिता आता पालकांनी इयत्ता पहिली पासूनच प्रत्येक मुला-मुलींना काठी चालविणे शिकविणे आवश्यक झाले आहे. त्यांना काठी चालविण्यात पारंगत करावे आणि शाळेत जाताना प्रत्येक मुला-मुलीला एक-एक काठी द्यावी. जेणेकरून मोकाट कुत्री त्यांच्या अंगावर आल्यास ते स्वरक्षणासाठी काठी चालवून कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतील. पालकांना हे करावेच लागेल. कारण मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात बीड नगर परिषद पुर्णत: असमर्थ ठरली असून तुमची मुले-मुली मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जर दुर्दैवाने मृत्युमुखी पडली तर यात बीड नगर परिषदेचे नुकसान होणार नाही, तुमचे होईल. तुमची मुले जीवनाशी जाऊ शकतात. तेव्हा दक्षता बाळगा आणि आपल्या मुला-मुलींना काठी चालविणे शिकवून शाळेत जाताना सुद्धा प्रत्येकाला एक-एक काठी द्या. असे आवाहन मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
Comments
Post a Comment