काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची कर्नाटक निवडणुकीसाठी प्रचारकपदी नियुक्ती.
मुंबई, दि. २७ एप्रिल
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होत असून काँग्रेस पक्षाने या निवडणुकीच्या प्रचारासाठी नेते व पदाधिकारी यांची मोठी फौज मैदानात उतरली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारकपदी नियुक्ती केली आहे. गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात ते काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करतील.
“कर्नाटकात ४० टक्के कमिशनवाले सरकार असून भाजपाच्या भ्रष्ट कारभाराला कर्नाटकची जनता कंटाळली आहे. भाजपाच्या भ्रष्ट सरकारला घरी बसवण्याचा ठाम निर्धार कर्नाटकच्या जनतेने घेतलेला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर देशभरातील वातावरण काँग्रेसमय झाले आहे. काँग्रेसवर जनतेचा विश्वास आणखी दृढ झालेला आहे. काँग्रेस पक्षच सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे ही जनतेची भावना असून जनतेचा विश्वास काँग्रेस पक्ष सार्थ ठरवेल. काँग्रेस उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी प्रचारासाठी घराघरात जाऊ”, असा निर्धार राजहंस यांनी व्यक्त केला आहे.   
 यापूर्वीसुद्धा त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष संघटनेसाठी ते करत असलेल्या कामाची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची कर्नाटक विधानसभेसाठी गुलबर्गा लोकसभेतील सर्व विधानसभा मतदासंघांत प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जून खर्गे, राहुलजी गांधी यांचा संदेश व काँग्रेस विचारधारा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदार संघ पिंजून काढू. प्रदेशाध्यक्ष श्री.नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असेही राजहंस म्हणाले.
  
Comments
Post a Comment