जाती धर्माचे राजकारण देशासाठी घातक- सतीश बनसोडे
नितीवान निर्लोभी राज्यकर्त्यांची देशाला गरज; बीडमध्ये एकदिवशीय कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न
बीड प्रतिनिधी : भारतामध्ये जातिव्यवस्थेची उतरंड ही प्रमुख समस्या आहे. देशाच्या राजसत्तेचे सूत्र नेहमी ठराविक विशिष्ट घराणेशाहीच्या हातात असल्याचा पुरावा देण्याची गरज नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण लोकशाहीमध्ये अपेक्षित असते. आज नितीवान, निर्लोभी राज्यकर्त्यांची देशाला गरज आहे. देशात जाती- धर्माच्या नावाने राजकारण केले जात आहे. जाती धर्माचे राजकारण आपल्या देशासाठी घातक असल्याची मांडणी फुले- आंबेडकरी विचाराचे अभ्यासक सतीश बनसोडे यांनी केली.
बीड येथे रविवारी सकाळी ११ ते सायं ०५ या वेळेत परिवर्तनवादी विचाराच्या कार्यकर्त्यांचे एक दिवसीय नेतृत्व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर तुलशी संगणकशास्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतीश बनसोडे बोलत होते. विचारमंचावर विविध परिवर्तनवादी विचारसरणीचे जाणते अभ्यासक सूर्यकांत गायकवाड, चंद्रप्रकाश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सतीश बनसोडे म्हणाले की, भारतातील राजकीय समीकरणे नेहमी जातीधर्माच्या आधारावर जुळवले गेलेले आहेत, हे मानवतावादी समाजव्यवस्थेच्या निर्मितीच्या विरुद्ध आहे. काही राजकीय नेते हे जातीचे नेते म्हणून उदयाला येतात आणि ते देशाचे नेते बनतात हे संसदीय लोकशाहीसाठी गंबीर आहे. सध्या ज्या कुटुंबात सत्ता आहे त्या कुटुंबात जन्माला येणारा नेता बनतो ही संस्थानिकांकडून लोकशाहीत केली जाणारी फसवणूक आहे. त्यामुळे मतदारांनी धैर्य बाळगणे अपेक्षित असल्याचे सतीश बनसोडे यांनी सांगितले.
नवीन नेतृत्व आणि ते करण्यासाठीचे कलागुण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करायचे असतील तर फुले- आंबेडकर तत्वज्ञानामध्ये आहेत. ज्याला कुणाला आदर्श लोकशाही राज्यव्यवस्था निर्माण करायची आहे त्यांनी या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज आहे. चळवळीत काम करत असतांना ध्येय माहित असण्यापेक्षा ध्येयाकडे जाण्याचा मार्ग माहित असणे अपेक्षित असून कार्यकर्त्यांनी आणि नेतृत्व करणारांनी प्रामाणिक असणे सर्वात महत्वाचे असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. दरम्यान सूर्यकांत गायकवाड यांनी प्रभावी मांडणी केली. निर्लोभी नेतृत्व निर्माण कसे होतात याचे विविध प्रात्याक्षिक उदाहरणे देऊन त्यांनी उपस्तीताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक मानव अधिकार अधिष्ठान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपले जीवन अनुभव सांगून येणाऱ्या काळात महाराष्ट्रासह देशभरात राजकीय नेतृत्व फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यात निर्माण होण्यासाठी संघटना काम करेल असे अभिवचन दिले. यावेळी जेष्ठ पत्रकार सुधाकर सोनवणे, बागडे, राजेश शिंदे, अंकुश चव्हाण, राहुल जावळे, संगमेश्वर आंधळकर, आनंद शिंदे, नाना पाइके, डॉ. चंद्रकांत साळवे, महावीर वैरागे यांच्यासह कार्यक्रमाला बीड जिल्हाभरातून विविध विचारधारेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment