रमजान सुरु होताच खजुरांची मागणी वाढली
सलग चार वर्षांपासून एप्रिल महिन्यात रमजान...!
सोयगाव प्रतिनिधि मुश्ताक शाह
गुरूवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने इस्लामी कालगणनेतील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुस्लीम बांधवांचा पहिला रोजा पार पडला. रमजानचा रोजा सोडतांना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुरांच्या विक्रीत वाढ होते,वाढत्या मागणीमुळे यंदा रमजान सुरु होताच खजुरांची मागणीही वाढली आहे.
बाजारात मध्य पूर्वेच्या देशांमधून येणाऱ्या खजुराला जास्त मागणी आहे. ट्युनिशिया येथील खजूर २०० ते २,५०० रुपये, तर इराणमधील ब्लॅक लिली खजूर २४० ते २५० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सौदी अरेबिया येथील नावर जुमेरा खजुरासाठी किलोमागे २४० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय इराकमधील जाएदी खजुरालाही चांगली मागणी आहे. अजवा खजुराची किंमत सध्या १,००० ते १,५०० रुपये किलो आहे. तीदेखील १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे.
या शिवाय कलमी, ओमानी, मस्कती खजूर असे पर्याय उपलब्ध आहेत. खजुरांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. किमिया या खजुराला मोठी मागणी असून, त्याचा दर ६०० ग्रॅमसाठी १२० ते १३० रुपयांवरून १५० रुपयांवर गेला आहे. ७० रुपये किलो दराने मिळणाऱ्या साध्या खजुराची किंमत ही ९० रुपयांपेक्षा पुढे गेली आहे. विविध दुकानात खजूर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
---
प्रत्येक मशिदीत तरावीहची नमाजचे आयोजन...
गुरूवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्री साडेआठनंतर विशेष तरावीहची | नमाज प्रत्येक मशिदीमध्ये अदा करण्यास सुरुवात करण्यात आली. ती काही ठिकाणी दहा दिवस तर काही ठिकाणी तीस दिवस रोज रात्री चालणार आहे. व्यापारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी काही ठिकाणी दहा दिवसांच्या तरावीह नमाजचे आयोजन करण्यात आले होते.
सलग चौथ्या वर्षी मार्च - एप्रिलमध्ये रोजे
पवित्र रमजान महिना उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात येण्याचे यंदाचे चौथे वर्षे आहे.
या अगोदर सन २०२० मध्ये २५ एप्रिल, २०२१ ला १४ एप्रिल, तर २०२२ ला ३ एप्रिल रोजी रमजान पर्व सुरु झाले होते. यंदा २३ मार्चपासून रमजान सुरु झाले असले तरी चार आठवडे रमजान एप्रिल महिन्यात येत आहे. दरम्यान, आता बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment