विद्यार्थ्यांनों, प्राप्त ज्ञानाचा वापर करून आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हा - प्राचार्य सानप
विद्यार्थ्यांनों, प्राप्त ज्ञानाचा वापर करून आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हा!
बलभीम महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्राचार्य डॉ. वसंत सानप यांचे प्रतिपादन
बीड (प्रतिनिधी) - विद्यार्थी हे राष्ट्राचे आधारस्तंभ असून त्यांनी स्वातंत्र्य व स्वैराचार यातील फरक ओळखला पाहिजे. सर्व विषयांचे सखोल ज्ञान मिळवून मिळवलेले ज्ञान फक्त महाविद्यालयीन परीक्षेपुरते न वापरता आपल्या आयुष्यातही या ज्ञानाचा उपयोग करून आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे व आपले जीवन समृद्ध करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी बलभीम महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात केले.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. २७ जानेवारी रोजी इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. विजय गुंड, पर्यवेक्षक प्रा. राम जाधव, प्रा. अश्विनी वावरे, प्रा. प्रशांत धापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. विजय गुंड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थी जीवनात शिस्तीला महत्व असते. सखोल ज्ञान मिळविण्याची लालसा, सततचा सराव व वर्तनातील शिस्त यामुळे विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याची द्वारे खुली करता येतात. श्रीमती प्रा. अश्विनी वावरे म्हणाल्या की, शिक्षक व पालकांच्या मते पौगंडावस्थेतील मुलांचा मोबाईल हा सर्वात मोठा शत्रू आहे. परंतू ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणेच मोबाईल या साधनाचे देखील चांगले व वाईट परिणाम असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानवृद्धीसाठी अल्पप्रमाणात जर मोबाईलचा वापर केला तर तो निश्चितच लाभदायक ठरू शकेल.
विद्यार्थ्यांमधून अभिजीत हराळे, अयान खान, दिशा ठक्कर, अक्षय म्हस्के, अरूंधती शिंदे, अब्दुल रहेमान व कु. बुगदे यांनी आपले विचार व मनोगते व्यक्त केली. या समारंभाचे सूत्रसंचालन ऋतुजा जावळे व श्रेया अडचित्रे यांनी केले तर शेख वासेख युसूफ़ याने आभार मानले. या समारंभास कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट -
स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक-एक पाऊल पुढे टाका !
हा अल्प निरोप आहे. आपल्याला येथून पुढेही अजून खुप शिक्षण घ्यायचे आहे. बारावीची परीक्षा तोंडावर आहे. ही परीक्षा आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने द्यायची आहे. या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्यानंतर पुढे आपल्याला अनेक वेगवेगळे मार्ग खुले होतील. त्यासाठी आपण संपूर्ण तयारीनिशी तयार राहायला हवे आणि आपल्यासह आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता एक-एक पाऊल पुढे टाकायला हवे. असे मनोगत आभार प्रदर्शनावेळी शेख वासेख़ युसूफ़ या विद्यार्थ्याने व्यक्त केले.
Comments
Post a Comment