जातीनिर्मूलन मानवतावादी समाजनिर्मितीचा अग्रक्रम- सतीश बनसोडे

जातीनिर्मूलन मानवतावादी समाजनिर्मितीचा अग्रक्रम- सतीश बनसोडे

 शिक्षण आणि राजकारणातील धर्माचा शिरकाव हद्दपार करा

 बीडमध्ये एकदिवशीय अभ्यासवर्ग प्रशिक्षण शिबिरात ज्ञानसंवाद


बीड प्रतिनिधी : आजच्या सर्वतऱ्हेच्या समस्या सोडवण्याचे विचारसूत्र फुले- आंबेडकरी तत्वज्ञानात आहे. म. फुलेंनी आपल्या विचाराला कृतीची जोड देत स्त्री समस्या, अस्पृश्याता निवारण, शेतकरी समस्यांना न्याय दिला. घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या रूपात एक जीवनपद्धती आपल्याला दिली आहे. आधुनिक ज्ञानाची चर्चा करत असतांना कालबाह्य ज्ञानाची चर्चा टाकून देतांना कुणी दिसत नाही. देशभरातील सध्याची सर्व कालबाह्य चर्चा निकालात काढण्यासाठी विवेकवादी समाजरचना प्रस्तापित करणे आवश्यक आहे. त्यासाठी जातीनिर्मूलन मानवतावादी समाजनिर्मितीचा अग्रक्रम असल्याची वैचारिक मांडणी सतीश बनसोडे यांनी केली.
शनिवारी दि. २८ रोजी येथील स. मा. गर्गे वाचनालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीबा जोतीराव फुले विचारधारेचे एक दिवशीय अभ्यासवर्ग प्रशिक्षण शिबीर आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुले - आंबेडकर यांना समजून घेऊया या विषयावर सतीश बनसोडे बोलत होते. विचारमंचावर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, गौतम वाघमारे, डॉ. अशोक गायकवाड, बाबासाहेब मोरे, वंचितचे माजी जिल्हाप्रमुख अनिल डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सतीश बनसोडे म्हणाले की, महात्मा फुले यांच्या चळवळीतून सत्यशोधक समाज, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, शेतकरी समस्या ई. बाबीची निर्णायक चर्चेची सुरुवात झाली. त्यांनी पहिला नाव्ह्यांचा संप आणि शेतकऱ्यांचे बंड घडवून आणले. फुले यांना बालहत्या प्रतिबंधगृह काढण्याची वेळ का आली? या संदर्भातील समकालीन परिस्तितीची चर्चा करत सध्याच्या स्त्री समस्येचा आढावा बनसोडे यांनी घेतला. समाजामध्ये आमूलाग्रह बदल घडवणे हा फुले- आंबेडकर यांचा विचार मानवकल्याणाचा विचार आहे असेही त्यांनी सांगितले..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि कबीर यांना गुरु मानले आहे. पण त्यापूर्वी बाबासाहेबांनी महात्मा फुले यांचा मी वारसदार आहे असे सांगितले आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. समताधारित नवसमाज निर्मितीसाठी फुले- आंबेडकर यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ज्याला समस्यामुक्त समाज निर्माण करायचा आहे त्या प्रत्येकाने धर्मचिकित्सा, आर्थिक चिकित्सा, राजकीय चिकित्सा, सांस्कृतीक चिकित्सा करणे महत्वाचे आहे. मार्क्स वादी/समाजवादी यांच्यात धर्माचिकिस्तेचा अभाव जाणवत असल्याचे निरीक्षणही बनसोडे यांनी प्रतिपादित केले.
प्रांतिक भेद, वांशिक शोषण यांना धर्माची मान्यता नाही परंतू जातीयतेला धर्माची मान्यता आहे. धर्मउतरंडीची व्यवस्था, संपत्ती आणि सामाजिक दर्जा हे सत्तेचे उगमस्थान आहेत. राजकीय व्यवस्थेतून सध्या धार्मिक चर्चेला उधाण आलेले दिसते. आज शिक्षण आणि राजकारणातील धर्माचा शिरकाव हद्दपार करण्याची गरज असल्याचे मत सतीश बनसोडे यांनी व्यक्त केले.
 यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, गौतम वाघमारे, डॉ. अशोक गायकवाड, बाबासाहेब मोरे, वंचितचे माजी जिल्हाप्रमुख अनिल डोंगरे यांनी कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रात विविध मुद्यावर विशलेषणात्मक प्रभावी सैद्धांतिक चर्चा घडवून आणली. यावेळी बीड जिल्हाभरातून विविध चळवळीत सक्रिय असलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्रसंचलन पत्रकार सुधाकर सोनवणे यांनी केले.


ज्ञानसंवादात युवकांचा सहभाग

फुले यांनी ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले करून या देशात मोठी क्रांती केली. त्यापूर्वी बहुजनांसाठी ज्ञानाचे दरवाजे बंद होते. आजचा ज्ञानव्यवहार व्यवस्थेला कसा पोषक आहे आणि तो कसा विकसित केला जातो याचे सूत्रीय संदर्भ देत कार्यक्रमात सहभागी युवकांनी चर्चा केली. युवकांचा उत्साह आणि ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, समाजसत्ता, राजकीय सत्ता यावर युवकांनी केलेला ज्ञानसंवाद चर्चेचा विषय ठरला. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी विशेष मोहीम राबवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी