मूकनायक मानवमुक्तीच्या लढ्याचा सिद्धांत,सुधाकर सोनवणे : बार्टी केंद्रात मूकनायक दिन उत्साहात
बीड प्रतिनिधी :-शोषित, वंचित, उपेक्षित समाजाच्या उन्नतीबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिकातून मानवमुक्तीचे सिद्धांतन केले. मानवी गुलामगिरी, दुःख आणि शोषणाचे समर्थन बनलेली तत्कालीन व्यवस्थेतील स्थितीशीलता बदलण्याची समतावादी- न्यायवादी- स्वातंत्रवादी परिभाषा मूकनायकाच्या माध्यमातून सामान्यांच्या कंठी उतरली. त्यामुळेच मूकनायक हे तळागाळातील उपेक्षितांचा बुलंद आवाज बनले. तसेच मूकनायक मानवमुक्तीच्या लढ्याचा सिद्धांत असल्याचे मत जेष्ठ पत्रकार सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले.
बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौक शिवाजी नगर येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यताप्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून मंगळवार (दि.३१) रोजी मूकनायक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधाकर सोनवणे बोलत होते. यावेळी विचार मंचावर अध्यक्षक म्हणून केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे, संपादक सुनिल डोंगरे आदींची यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सुधाकर सोनवणे म्हणाले की, आज आपली लोकशाही, संविधान धोक्यात असल्याची चर्चा होतांना दिसते. पण लोकशाही आणि संविधान कुणापासून धोक्यात आहे? जर लोक संविधानवादी आणि लोकशाहीवादी असतील तर लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचा प्रश्न निकालात निघतो. त्यामुळे अशी चर्चा करणाऱ्याने प्रथम संविधानवादी आणि लोकशाहीवादी बनावे. त्यांना घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण ही भूमी बुद्धाची भूमी आहे. घटनाकाराने जे अधिकार सर्वाना दिलेले आहेत ते अधिकार कुठलीच धर्मव्यवस्था माणसाला देत नाही. म्हणून मूकनायकाच्या पहिल्या अंकात विषमताधिष्ठ जन्माधिष्ठित, श्रेणीबद्ध जातधर्माची चर्चा घटनाकाराने केली. इथे माणसांवर माणसांनी गुलामी लादलेली आहे. लादलेली गुलामी झुगारून देता येते. लोकांना गुलामीतून काढण्याची जबाबदारी आजच्या माध्यमव्यवस्थेवर आलेली आहे. पण जे माध्यम गुलामगिरीतले आहे ते आज गोदी माध्यम म्हणून ओळखले जाते. आज मूकनायकाच्या वारसाची समाजाला गरज असल्याचे मतही सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव राहूल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल सचिन काकडे, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. प्रतीक्षा हिवरकर,प्रा. निलेश मुंदडा, सहाय्यक प्रा.अर्चना आठवले,वरिष्ठ लिपिक विनोद जोगदंड, कनिष्ठ लिपिक दिलीप गायकवाड, व्हिडीओ ग्राफर राहुल शिंदे, सहाय्यक दीपक वाघमारे, सेवक दिपालीताई निर्मळ, सेवक जयश्रीताई तायड यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment