विनायकराव मेटेंची चळवळ ज्योतीताईंनी हाती घेतली; त्याला ताकदीने बळ देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही



विनायकराव मेटेंचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करणार-चंद्रशेखर बावनकुळे

मेटे साहेबांचे काम निर्धाराने पुढे नेणार : डॉ. ज्योतीताई मेटे

व्यसनमुक्ती फेरीचा हजारोंच्या उपस्थितीत समारोप

हजारों विद्यार्थी, तरुणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ


बीड, दि. ३१ (प्रतिनिधी) : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांनी २०१५ साली व्यसनमुक्त अभियानाची सुरुवात करुन मुख्यमंत्री असताना मला बोलविले. मात्र, त्यावेळी मला येता आले नाही. आज आलो परंतु दुर्दैवाने दिवंगत विनायकराव मेटे 
आपल्यात नाहीत. मात्र, विनायकराव मेटे यांनी हाती घेतलेली चळवळ डॉ. ज्योतीताई मेटे पुढे चालवत आहेत. या चळवळीला सरकार म्हणून राज्यभर बळ दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्षाच्या शेवटच्या दिवशी तरुण नवर्षाच्या स्वागतासाठी व्यसन करतात. यामुळे भविष्यात या तरुणांचे कुटूंब उध्वस्त होऊन समाज व्यसनाधिन होतो. म्हणून दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे नववर्षाच्या आदल्या दिवशी दरवर्षी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती फेरी काढून भव्य संगीत रजनी घेऊन गोड दुध पाजत असत. हीच चळवळ आत डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी हाती घेतली 
आहे. शनिवारी (दि. ३१) या निमित्त भव्य व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढून त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे, डॉ. ज्योतीताई मेटे, 
शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष राजन घाग, भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, युवकचे जिल्हाध्यक्ष 
रामहरी मेटे, अशुतोष मेटे, सी. ए. बी. बी. जाधव, सुहास पाटील , अनिल घुमरे, राहुल मस्के, बबन माने आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विनायकराव मेटे यांनी आपली हयात सामाजिक कामात घालविली. २४ तास ते समाजाचे काम करत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरबी समुद्रातील स्मारक, मराठा 
आरक्षण हे त्यांच्या मनातील मुद्दे होते. त्यांनी व्यसनमुक्त समाज व्हावा हा विडा देखील उचलला होता. नववर्षाच्या आदल्या दिवशी तरुण व्यसन करतात व नंतर व्यसनी होतात म्हणून त्यांनी 
२०१५ साली बीडमध्ये व्यसनमुक्ती फेरी काढून संगीत रजनी घेऊन दुध पाजण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी मला ही संकल्पना सांगून येण्यासाठी निमंत्रण 
दिले. मी म्हणालो, मी तर व्यसनच करत नाही तर येऊन काय करु, तर विनायकराव मेटे म्हणाले, लोकांना सांगू की व्यसन केले नाही तर राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यानंतर दुसऱ्या वेळी मी येण्याचे 
निश्चित झाले होते. परंतु, त्यावेळीही दुर्दैवाने येता आले नाही.आता त्यांचा वसा ज्योतीताईंनी हाती घेतला आहे. मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ज्योती वहिनी आल्यानंतर अडचण 
असेल तर गिरीश महाजन, पालकमंत्र्यांना पाठविले तरी चालेल असे त्यांनी सांगीतले. मात्र, तुम्ही कार्यक्रम घेताय तर मी नक्की येणार असा शब्द आपण त्यांना दिला होता. आता ज्योतीताईंच्या 
मागे आपण खंबीरपणे पाठीशी राहून साथ देणार आहोत. विनायकराव मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी 
आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, मा.आ.भीमराव धोंडे, किरण पाटील,अशोक हिंगे, कुंडलिक खांडे, रमेश पोकळे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के, मनीषा कुपकार, मनीषा कोकाटे आदी उपस्थित होते.

विनायकरावांचे कार्य सरकार पुढे नेणार : चंद्रशेखर बावनकुळे

व्यसनमुक्त समाजानेच देशाची उन्नती होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील व्यसनमुक्तीचे काम करत आहेत. विनायकराव मेटे यांनी हाती घेतलेला वसा व कार्य आता ज्योतीताई मेटे चालवित आहेत. ते कार्य सरकार करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

साहेबांचे काम निर्धाराने पुढे नेणार : डॉ. ज्योतीताई मेटे

मेटे साहेबांनी सामाजिक कामात हयात घालविली. त्यांची उक्ती आणि कृती सारखी असायची. म्हणूनच आमचा विवाह देखील सामुदायिक विवाह सोहळ्यातच झाला असे डॉ. ज्योतीताई मेटे म्हणाल्या. समाज निव्यर्सनी असावा असासाहेबांचा कटाक्ष असायचा. त्यासाठी ते सातत्याने चळवळ राबवित होते. म्हणूनच यंदा व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर 
बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे यांना निमंत्रण देताच त्यांनी विनाविलंब स्विकारल्याने आमची उमेद व उत्साह वाढल्याचे डॉ. ज्योतीताई मेटे म्हणाल्या. साहेबांचे काम पुढे घेऊन जाण्याचा 
निर्धारही यावेळी हजारोंच्या साक्षीने ज्योतीताईंनी व्यक्त केला. 

विनायकरावांच्या व्यसनमुक्तीच्या प्रेरणेचा समाजाला फायदा :अतुल सावे

३१ डिसेंबरच्या रात्री तरुण व्यसनाकडे वळतात. त्यामुळे या दिवशीपासून विनायकराव मेटे यांनी व्यसनमुक्तीची चळवळ सुरु केली. त्यांनी व्यसनमुक्तीची दिलेली प्रेरणा समाजाला फायदेशिर असल्याचे मत पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. विनायकराव मेटेंच्या विचाराने पुढे जाऊ, असेही श्री. सावे म्हणाले.

हजारोंनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

दरम्यान, कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितांना व्यसनमुक्तीच शपथ देण्यात आली. हजारो विद्यार्थी व तरुणांनी यावेळी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी