परळी औष्णिक विद्युत केंद्रासमोरील उपोषणकर्त्याच्या मागण्या ताबडतोब मंजूर करा



किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
परळी प्रतिनिधी -महाराष्ट्रातील परळी,नाशिक,चंद्रपूर व इतर औष्णिक विद्युत केंद्रा मध्ये संपादित केलेल्या जमिनीवर थर्मल पावर स्टेशन उभे असून विद्युत निर्मिती केंद्रे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहेत.सदर प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी ज्या शेतकरी बांधवांच्या आहेत त्या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला त्या प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी नोकरी मध्ये समाविष्ट करून घेण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे व तशा प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रके सुद्धा आहेत.परंतु गेल्या 30 ते 40 वर्षापासून प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्यांना केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे समाविष्ट करून घेतलेले आहे.परंतु गेल्या 30-40 वर्षापासून त्या प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षणार्थी कालावधी अद्यापही संपत नाही व त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घेतले जात नाही.त्यामुळे त्या प्रकल्पग्रस्त सेवेमध्ये असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना अद्यापही शासकीय सेवेचे कोणतेही लाभ मिळत नाहीत.त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे व त्यांचे कुटुंबीय वाढत्या महागाईच्या काळात उपासमारीच्या संकटाला सामोरे जात आहे.कायद्याने दिलेल्या हक्कापासून सर्व प्रकल्पग्रस्त गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहेत. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यासाठी गेल्या सात दिवसापासून परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या समोर प्रशिक्षणार्थींनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.परंतु प्रशासनाने अद्यापही त्याची दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे व उपोषणार्थींना दवाखान्यामध्ये उपचारासाठी ऍडमिट करावे लागत आहे.नुकतेच बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उपोषणार्थी चा बळी गेलेला आहे.आणखी किती उपोषणार्थींचे बळी आपण घेणार आहात? लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या मागण्यांची दखल आपण कधी घेणार आहात? का त्यांचे संपूर्ण कुटुंब संपल्यानंतर आपल्याला जाग येणार आहे ? कृपया ताबडतोब या उपोषणार्थींची दखल आपण घ्यावी व त्यांच्या न्याय मागण्या मंजूर कराव्यात अशी मागणी किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना ई-मेलद्वारे केली आहे.तसेच महापारेषण व महाजनको कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा ॲड. माधव जाधव यांनी त्या मागणी संदर्भात निवेदन पाठवलेले आहे. व उपोषणकर्त्यांची मागणी मान्य करून उपोषण लवकरात लवकर सोडवावे अशी विनंती केली आहे. ॲड माधव जाधव व शेतकरी संघटनेचे नेते कालिदासराव आपेट यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व त्या मागण्या मंजूर करण्यासंदर्भात शासन दरबारी व प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी