मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नेहमीप्रमाणे दाखवली कर्तव्यतत्परता


"त्या" गल्लीची केली पाहणी, नाली बनविण्याचा दिला शब्द;नागरिकांनी मानले आभार !

बीड (प्रतिनिधी) - आठ दिवसांपूर्वी "स्वर्ग मिळावे म्हणून नमाज़साठी जाताना नरक यातनेचा अनुभव ! मुख्याधिकारी साहेब प्रभाग क्रमांक १८ मधील या पाच फुटाच्या गल्लीत एकदा याच ..." या शीर्षकाने मुक्तपञकार एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी माध्यमातून  बातमी दिली होती. याची दखल घेऊन बीड नगरपरिषद चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत नेहमीप्रमाणे आपल्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची प्रचिती दिली. तसेच या गल्लीत नाली बनवून देऊ असा शब्द दिल्याने उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांचे आभार मानले.
           गेल्या अनेक महिन्यांपासून शहेंशाहवली दर्गामागे असलेल्या दर्गा तलाव पासून जवळ न्यू शहेंशहानगर परिसरातील मस्जिद मध्ये जाण्यासाठी नागरिकांना जी पाच फुटाची गल्ली एकमेव मार्ग आहे. त्यातही पलीकडच्या परिसरातील नाल्याचे गलिच्छ पाणी या गल्लीतून नाली सारखे २४ तास धो-धो वाहत असल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करून मन:स्तापाला सामोरे जावे लागत होते. याविषयी मुक्तपञकार एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी माध्यमातून बातमी दिल्यावर मुख्याधिकारींनी याची दखल घेत स्वतः जातीने या भागात जाऊन गल्लीसह जिथून नालीचे पाणी गल्लीमध्ये शिरते तिथपर्यंत पाहणी केली. बीड नगर परिषदेत उमेश ढाकणे यांनी जेव्हापासून मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला तेव्हापासून जनतेला भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर कोणी मांडल्या की, प्रत्यक्ष समस्येच्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी काय करावे लागेल ? किंवा काय करता येईल ? याची शहानिशा जातीने करताना बीड शहरवासीयांना हमखास दिसत आहे. येथेही पाहणी करण्यासाठी गेल्यावर ढाकणे यांनी आपल्या तीक्ष्ण नजरेने नाली बद्दल वर्मावर बोट ठेवले आणि तेथे उपस्थित नागरिकांना प्रश्न केला की, या गल्लीचे काँक्रिटीकरण नव्याने करण्यात आलेले दिसते. जेव्हा काँक्रिटीकरण केले गेले तेव्हा येथे नाली का बनवण्यात आली नाही ? हा मुद्द्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर उपस्थितांनी गल्लीचे काँक्रिटीकरण करताना तेव्हाच्या नगरसेवकांनी नागरिकांचे काही एक न ऐकता, गल्लीत नाली न बनविता सरधोपटपणे गल्लीचे काँक्रिटीकरणाने सपाटीकरण करून टाकले. तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला येथे नरक यातना सहन कराव्या लागत असल्याचे म्हटले. नागरिकांचे म्हणणे ऐकल्यानंतर लवकरच गल्लीच्या एका बाजूने नाली तयार करून दिली जाईल असा शब्द ढाकणे यांनी दिला. यामुळे येथील उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकारींचे आभार मानले. यावेळी रफिक खान नाशाद, परवेज़ खान नाशाद यांच्यासह मुक्तपञकार एस.एम.युसूफ़ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी