छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक मुंबई रस्ता दुरुस्तीसाठी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी ६ नोव्हंबरपर्यंत मागितली वेळ



नाशिक मुंबई रस्ता ६ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करू ; आंदोलन न करण्याची अधिकाऱ्यांची छगन भुजबळ यांना विनंती

नाशिक मुंबई रस्ता ६ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त होणार नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची छगन भुजबळ यांना माहिती

नाशिक,दि.३१ ऑक्टोबर :- नाशिक मुंबई रस्ता दि.६ नोव्हेंबर पर्यंत संपूर्णपणे खड्डेमुक्त करण्यात येईल. तो पर्यंत आंदोलन करू नये अशी विनंती नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. त्यानुसार छगन भुजबळ यांची ही विनंती मान्य करत उद्या आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला असून दि.६ नोव्हेंबर पर्यंत अधिकाऱ्यांना वेळ वाढवून दिला आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात नॅशनल हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते पडघा दरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणी झाल्यानंतर दि.३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा १ नोव्हेंबर पासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सातत्याने रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता. तसेच दैनदिन झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. तसेच आज पदाधिकाऱ्यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर आज पुन्हा भुजबळ फार्म येथील अधिकाऱ्यांसमवेत कामाचा आढावा घेतला.

यावेळी नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे, पिक इन्फ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, गोरख बोडके, उद्योजक मनीष रावत, शहराध्यक्षा कविता कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अमोल नाईक, अमर वझरे, मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, संतोष भुजबळ, नाना पवार, रविंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी यांच्याकडून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी गेल्या आठवड्यात पाहणीनंतर कामास सुरुवात करण्यात आली. परंतु पुन्हा पाऊस आणि दिवाळीच्या सुट्टीमुळे कामगार नसल्याने तसेच डांबर प्रकल्प बंद असल्याने काम करता आले नाही. दिवाळी नंतर पुन्हा काम सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्हाला अजून पाच ते सहा दिवसांचा वेळ मिळावा. त्यानुसार दि.६ नोव्हेंबर पर्यंत मुंबई नाशिक रस्ता पूर्ण खड्डेमुक्त करू असे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले. तसेच आंदोलन करण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे केली.

सदर बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती तसेच प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेल्या पाहणी नुसार अधिक वेळ अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी देण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक मुंबई रस्ता दि.६ नोव्हेंबर पर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ वाढवून देण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी मागितलेल्या वेळत काम न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. 


टोल नाक्यावरील अनुचित प्रकार रोखा

टोल नाक्यांवर वसुली करत असतांना टोलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अरेरावी करण्यात येत आहे. यातून अनेक वाद होत आहे. वारंवार होत असलेल्या या अनुचित प्रकारांना तातडीने आळा घालण्यात येऊन सबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात याव्यात असे छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार यापुढे होणार नाही याबाबत आवश्यक ती कार्यवाही करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

टोल नाक्यावर पाच मिनीटांपेक्षा अधिक वेळ वाहनांच्या रांगा लागल्यास त्वरित गाड्या सोडण्याच्या सूचना

टोल नाक्यावर टोल वसुली करतांना वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांना अनेक वेळ ताटकळत रहावे लागत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कार्यवाही करत टोल चालकांना सूचना कराव्यात. तसेच पाच मिनिटांहून अधिक वेळ वाहनांच्या रांगा लागल्यास तात्काळ वाहने सोडण्यात यावी अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावर टोल चालकांना याबाबत पत्रक काढून सूचना देण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


रस्ते अपघातात मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी

मुंबई नाशिक महामार्गावर नाशिक ते इगतपुरी दरम्यान खड्यांमुळे आतापर्यंत १० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या कुटुंबियांना नॅशनल हायवे प्राधिकरनाच्या वतीने मदत देण्यात यावी अशी सूचना छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. याबाबत सदर नागरिकांची माहिती घेऊन शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींच्या समवेत चर्चा करतांना दिली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी