लासलगाव विंचूरसह सोळागाव योजनेच्या नूतनीकरणाचे काम तातडीने सुरू करा - छगन भुजबळ




सोळागाव पाणी पुरवठा योजनेस आठवडाभरात कार्यारंभ आदेश; मंत्री छगन भुजबळ यांची पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा


सोळागाव पाणी पुरवठा योजनेचा विद्युत प्रवाह खंडित होणार नाही याबाबत छगन भुजबळ यांच्याकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना


नाशिक,लासलगाव,दि.२९ ऑगस्ट:- लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होणार आहे.नूतनीकरणाच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात यावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कुठल्याही परिस्थितीत योजनेचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 


लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजना आढावा बैठक माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी छगन भुजबळ यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत योजनेच्या कामाबाबत चर्चा केली. यावेळी योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश देण्यात येईल अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिली.


यावेळी लासलगावचे सरपंच तथा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर,गटविकास अधिकारी संदीप कराड,पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे,अ.पी.बिन्नर, उपअभियंता एस.मिस्त्री, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.आव्हाड, उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे, प्रवीण सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गोसावी, , विस्तार अधिकारी एस.के.सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, जी.टी.खैरनार, सरपंच सचिन दरेकर,मंगेश गवळी, तुकाराम गांगुर्डे, पांडुरंग राऊत, लासलगावचे उपसरपंच रामनाथ शेजवळ,योगेश पाटील, ललित दरेकर, गोकुळ पाटील, अजय ब्रम्हेचा, मधुकर गावडे, डॉ.विकास चांदर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.


यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सोळागाव पाणी पुरवठा योजनेसाठी दोन ठिकाणाहून पाण्याचे पंपिंग करावे लागते अशा वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाईपलाईन मधील पाणी पुन्हा मागे जाऊन प्रेशरमुळे पाईपलाईन अधिक जुनी झाल्याने लीकेज होऊन वारंवार पाणी पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या.

ते म्हणाले की, योजनेची पाईपलाईन अधिक जुनी झाल्याने या योजनेचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत रेट्रोफिटीग योजने अंतर्गत योजनेसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र दरडोई खर्च आणि साहित्याचे दर वाढल्यामुळे योजनेच्या खर्चात अधिक वाढ होत असल्याने योजनेसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. निविदा प्रक्रिया झाली मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने दोन महिन्यांहून अधिक काळ खात्याचा कारभार पाहण्यासाठी मंत्री नसल्याने कार्यारंभ आदेशाला विलंब झाला. आता या खात्यास पुन्हा गुलाबराव पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. याबाबत मंत्र्यांशी आपण चर्चा केली असून आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन कामास सुरुवात होईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.


ते म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात अधिक पाऊस झाल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडे करण्यात आले होते. त्यामुळे सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन उघडी पडल्याने पाणी पुरवठा बंद झाला होता. ही बाब लक्षात आल्यावर आपण तातडीने दोन दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. मात्र गाळाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्यातील गाळ कमी होण्यास अधिक विलंब झाला तसेच काही काळ गढूळ पाणी पुरवठा झाला. त्यानंतर पुन्हा एकदा नियमित पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.


 ते म्हणाले की, लिकेजचे प्रमाण अधिक असल्याने पुन्हा अडचणी येत होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्यात आला. त्यातून लिकेजची कामे करण्यात येत आहे. तसेच काही प्रमाणात पाणी पुरवठा करण्यास विलंब होत आहे. आता मात्र पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईपर्यंत समितीने पाणी पुरवठा सुरळीत कसा राहील यासाठी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

 
*रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासोबत आठदिवसात लासलगाव विंचूर व कोटमगाव रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण करा*

लासलगाव विंचूर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण अधिक वाढत आहे. यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याला विलंब होत असल्याने लासलगाव विंचूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण करण्यात यावे. तसेच रस्त्याला अडथळा निर्माण होत असलेल्या वृक्षांची छाटणी करून अडथळा दूर करण्यात यावा. त्याचप्रमाणे लासलगाव कोटमगाव रस्त्याच्या देखील साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण करण्यात यावे तसेच रस्त्यावरील खड्डे देखील तातडीने बुजविण्याचे काम करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी