कनक इंटरप्राईजेस चा घनकचरा व्यवस्थापन म्हणजे आंधळ दळतंय कुत्र पिठ खातय - भाई गौतम आगळे सर
बीड प्रतिनिधी:-नगर परिषद बीड यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे काम अमरावतीच्या कनक इंटरप्राईजेस या कंपनीला दिले आहे.परंतु या कंपनीचा कारभार म्हणजे आंधळ दळतय कुत्र पिठ खातय,अशाप्रकारे चालू असल्याचे मत कामगार नेते तथा रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.सविस्तर माहिती अशी की बीड नगर परिषदेने मागील दोन वर्ष अगोदर कनक इंटरप्राईजेस सोबत करारनामा करून कार्यारंभ आदेश दिला.परंतु सदरील एजन्सीने त्यास केराची टोपली दाखवली.त्यामुळे कामगार प्रतिनिधी तथा रोजंदारी मजदूर सेना बीड जिल्हा अध्यक्षाअनिता बचुटे यांनी दोन वेळा मा.जिल्हाधिकारी कार्यालय,बीड समोरील लिंबाच्या झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.त्यामुळे मा. जिल्हा अधिकारी, बीड यांनी,मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना व्यवस्थापक कनक एंटरप्राइजेस अमरावती,संघटना पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र जा.क्र. २०२१/दिनांक ०८/१२/२०२१ रोजी दिले होते. त्या नुसार संयुक्त बैठक घेऊन मुख्यधिकारी,न.प.बीड यांनी व्यवस्थापक,कनक इंटरप्रायजेस, अमरावती यांना पत्र जा. क्र.बीनप/कावी/आरोग्य/ ७६२५करोजी दिले. त्यात त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये असलेल्या कामगाराचे किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन अदा करण्यात यावे त्यांचे प्रॉव्हिडंट फंड भरले बाबत कामगारांना अवगत करणे इत्यादी नियम व अटीचे काटेकोरपणे पालन करणे आपणास करारनाम्याप्रमाणे बंधनकारक असून आपण याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. श्रीमती अनिता बचुटे यांना आपल्या घनकचरा कामकाजामध्ये काम उपलब्ध करुन द्यावे, नसता आपल्या कंपनीविरुद्ध कार्यवाही करून आपली कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे नमूद केले होते. परंतु सदरील एजन्सीने श्रीमती अनिता बचुटे यांना कामावर घेतले पण त्यांना व त्यांच्यासोबत कार्यरत सफाई कामगारांना किमान वेतन सहाशे रुपये रोज 18 हजार 660 रुपये प्रति महिना आहे, ते देणे बंधनकारक असताना फक्त दोनशे रुपये रोजी प्रमाणे साडेसात हजार रुपये , वेतन दिले जाते तेही दर दोन महिन्यानंतर दिला जातो.हजरी वेतन कार्ड( नियम 27 )वेतन चिठ्ठी देत नाही ,बँकेतून वेतन दिल्या जात नाही,दर महिन्याला सात तारखेच्या आत वेतन दिले जात नाही, भविष्य निर्वाह निधीचा यु एन ए नंबर अद्याप दिला नाही, याकरिता सफाई कामगारांनी स्वयंस्फूर्तीने बुधवार दिनांक 22 जून ते 25 जून 2022 सराफ चार दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याची सूचना रोजंदारी मजूर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड यांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद बीड उमेश ढाकणे यांना त्यांच्या भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून दिली असता मला याबाबत काहीही माहीत नाही असे उत्तर दिले. तर दुसरीकडे एजन्सीने नियुक्त केलेला पर्यवेक्षक हमीद चाऊस हा गुंड प्रवृत्तीचा आहे,आम्हाला मुख्याधिकारी किंवा कनक एंटरप्राइजेस चे व्यवस्थापक यांच्याशी भेट घालून द्या अशी विनंती सर्व सफाई कामगारांनी बीड शहर पोलीस चे पोलीस निरीक्षक श्री ढाकणे यांना शुक्रवार दिनांक 24 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता केली होती.तेव्हा त्यांनी मी मुख्याधिकारी ढाकणे साहेबाला बोलून तुमची बैठक घडवून आणतो तेव्हा तुम्ही काम बंद आंदोलन स्थगित करावे त्यावर कामगारांनी आमची भेट घालून दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत असे स्पष्टपणे सांगितले.त्याची पूर्तता अद्याप झाली नसल्यामुळे आजही काम बंद आंदोलन चालू ठेवले.मुख्याधिकारी नगर परिषद बीड हे गुंड प्रवृत्तीचा पर्यवेक्षक अमित चाऊस व एजन्सीचे व्यवस्थापक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सर्व सफाई कामगारांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.याचा अर्थ असा होतो की बीड नगर परिषदेचा कारभार आंधळ दळतंय तर कुत्र पिठ खातय असा अनागोंदी कारभार चालू आहे.असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कामगार नेते तथा रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी केला आहे.पत्रकावर रोजंदारी मजदूर सेना मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंड व संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा अनिता बिभीषण बचुटे यांच्या सह्या आहेत.
Comments
Post a Comment