पवनचक्की कंपनीचा शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला
पवनचक्की कंपनीचा शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला
खाजगी शेतजमिनीत बेकायदेशीर विद्युत पोल व लाईन
तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :- (दि. १३) बीड तालुक्यातील बालाघाट परिसरात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कायदे, न्यायालयीन आदेश आणि शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क अक्षरशः पायदळी तुडवत खाजगी शेतजमिनीत बेकायदेशीरपणे विद्युत पोल उभारून विद्युत लाईन टाकण्याचा उघड उघड मनमानी प्रकार केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही लेखी परवानगी, संमती, पूर्वसूचना अथवा वैधानिक प्रक्रिया न करता थेट शेतजमिनीत घुसखोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथील सर्व्हे नंबर १९७ मधील वडिलोपार्जित शेतजमीन डॉ. गणेश ढवळे यांच्या नावावर असून सदर जमीन त्यांच्या पूर्ण मालकी व प्रत्यक्ष कब्जात आहे. असे असतानाही “टोरांटो” पवनचक्की कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावातील विद्युत पोल ओढण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना हाताशी धरून शेतकऱ्याला गृहीत धरत जबरदस्तीने शेतजमिनीत प्रवेश करून विद्युत पोल उभारले असून पुढील काळात विद्युत लाईन टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा घाट घातला आहे. हा प्रकार म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांवर केलेला घाला असल्याचे डॉ. ढवळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
सदर कृत्य हे भारतीय दंड संहिता कलम ४४१ व ४४७ अंतर्गत स्पष्टपणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा (Criminal Trespass) असून, जमिनमालकाची संमती नसताना खाजगी शेतजमिनीत प्रवेश करणे हा कायद्याचा उघड उघड अवमान आहे. तसेच विद्युत अधिनियम २००३ व Indian Telegraph Act, 1885 मधील तरतुदींचा सर्रास भंग करून हा प्रकार करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्याला जाणीवपूर्वक केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या स्पष्ट निकालानुसार जमिनधारकाची संमती किंवा कायदेशीर परवानगीशिवाय खाजगी शेतजमिनीत विद्युत पोल व विद्युत लाईन उभारणे हे पूर्णतः बेकायदेशीर ठरते. असे असतानाही पवनचक्की कंपनीने न्यायालयीन आदेशांनाही हरताळ फासल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
शेतजमिनीत उभारण्यात आलेल्या विद्युत पोल व प्रस्तावित उच्चदाब विद्युत लाईनमुळे शेतीचे तुकडे पडत असून शेती उपयोगात गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच भविष्यात अपघात, जीवितहानी व मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला असून, यास संपूर्णपणे संबंधित पवनचक्की कंपनी जबाबदार राहील, असा ठाम इशारा डॉ. ढवळे यांनी दिला आहे.
सदर बेकायदेशीर विद्युत पोल व लाईन तात्काळ हटवून इतरत्र स्थलांतरित न केल्यास, संबंधित पवनचक्की कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच परवानगी देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून न्यायालयीन लढा व तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट आणि कठोर इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment