बीड जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट पाच दिवसांपासून बंद; रुग्णांचे प्रचंड हाल, पॅंथर सेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम- नितीन सोनवणे
बीड, दि. ८ डिसेंबर : बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) एकमेव लिफ्ट गेल्या शुक्रवारपासून (दि. ५ डिसेंबर) बंद पडल्याने रुग्णांचे अतोनात हाल सुरू आहेत. हात-पाय मोडलेले, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर रुग्णांना सिटीस्कॅन, एक्स-रे किंवा इतर तपासणीसाठी खालच्या मजल्यावर उतरणे अशक्य झाले आहे. वार्डबॉय (मामा) देखील अपुरे असल्याने रुग्णांना नातेवाईकांनाच खांद्यावर उचलून पायऱ्या चढ-उतार करावे लागत आहेत.ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 8 डिसेंबर) रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लिफ्ट बंद असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जन डॉ. राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी “लिफ्ट खराब झाली असून पार्ट्स मागवले आहेत, दोन दिवसांत दुरुस्त होईल,” असे सांगितले.मात्र “दोन दिवसांत चालू होईल म्हणजे रुग्णांनी दोन दिवस तडफडत मरायचे का?” असा संतप्त सवाल करीत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जनांना स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या २४ तासांत लिफ्ट दुरुस्त करून तात्काळ चालू करावी, अन्यथा सिव्हिल सर्जन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवला जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेने दिला आहे.दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून या लिफ्टचे वारंवार बिघाड होत असल्याचे रुग्ण आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे. देखभाल-दुरुस्तीचा अभाव आणि प्रशासकीय बेफिकीरपणा यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.
Comments
Post a Comment