कुंभमेळ्यातील वृक्षतोडीचा निर्णय तात्काळ रद्द करावा; हरित बीड अभियान व राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे

“तपोवन वाचवा – झाडे वाचवा – देश वाचवा” आम्ही बीडकर वृक्षप्रेमी सयाजी शिंदे सोबत  

कुंभमेळ्यातील वृक्षतोडीचा निर्णय तात्काळ रद्द करावा; हरित बीड अभियान व राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे 
बीड : ( दि.०८) झाडे लावा–झाडे जगवा या नावाखाली जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करणारे शासन एकीकडे पर्यावरण संवर्धनाचे गोडवे गात असताना दुसरीकडे नाशिक येथील तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी “साधुग्राम” उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करत “तपोवन वाचवा – झाडे वाचवा – देश वाचवा” ही जनजागृती मोहीम आज (दि. ०८) बीड येथे राबविण्यात आली. यावेळी "झाडे लावा -झाडे जगवा" , तपोवन वाचवा -झाडे वाचवा,आम्ही बीडकर वृक्ष मित्र सयाजी शिंदे सोबत " अशी घोषणाबाजी करण्यात आली.

ही मोहीम सामाजिक कार्यकर्ते व मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ – महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली खंडेश्वरी दीपमाळ परिसरात पार पडली. याच ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हरित बीड अभियानांतर्गत १५,००० रोपांची लागवड करण्यात आली होती. या परिसरातील बहुतांश रोपे आता नष्ट/काड्या झाल्याची वस्तुस्थिती यावेळी उघड झाली.

या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रामनाथ खोड , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शेख युनुस , शिवशर्मा शेलार, मुबीन शेख, अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी),रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक बीड) कॉ. डी.जी तांदळे (अध्यक्ष महाराष्ट्र किसान सभा जिल्हा बीड), अभिमान खरसाडे ( अध्यक्ष निसर्गभुमी संवर्धन संस्था बीड), काम्रेड ज्योतीराम हुरकुडे ( किसानसभा जिल्हा सेक्रेटरी बीड), बाजीराव ढाकणे (पर्यावरण मंच बीड), नवनाथ हुरकुडे ( उबाठा शिवसेना बीड), कुणाल नाईकनवरे ( पर्यावरण प्रेमी) , राजेंद्र आमटे (निसर्गप्रेमी) नागरिक उपस्थित होते.




तपोवन वृक्षतोडीचा निर्णय रद्द करण्याची मागणी

कुंभमेळा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी सुमारे १,८०० प्रौढ झाडे तोडण्यास मंजुरी दिली आहे. पर्यावरणप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर प्रशासनाने इतरत्र १५,००० झाडे लावू, असा दावा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.
हा निर्णय पर्यावरणविरोधी, अविवेकी व लज्जास्पद असल्याचे सांगत झाडतोडीची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.



बीड जिल्ह्यातील वृक्षलागवडीचे ऑडिट करा,३० लाख रोपलागवडीचे सत्य आडिट आवश्यक – हरित बीड अभियानातील अनियमितता

दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी हरित बीड अभियानांतर्गत पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत एका दिवसात ३० लाख रोपलागवडीचा दावा करण्यात आला. इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करून जिल्हाधिकारी यांचा सत्कारही करण्यात आला.मात्र यातील मोठा हिस्सा हा केवळ कागदोपत्री असल्याचे आरोप आंदोलनकर्त्यांनी केले.
बीड शहरातील खंडेश्वरी दीपमाळ परिसरातील १५,००० रोपे पूर्णपणे नष्ट झाली असून त्यांचे संवर्धन करण्यात आलेले नाही, हे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान स्पष्ट झाल्याचेही सांगण्यात आले.
त्यामुळे हरित बीड अभियानातील सर्व वृक्षारोपणाचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.




राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीचे देखील ऑडिट करावे

धुळे–सोलापूर, अहमदनगर–परळी, पैठण–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि बीड–अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब आदी प्रौढ वृक्षांची तोड करण्यात आली.
नियमांनुसार त्याऐवजी समतुल्य वृक्षलागवड करण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर असताना, अनेक ठिकाणी रोपलागवड कागदोपत्रीच ठेवली गेली किंवा झुडपे लावून फसवणूक करण्यात आली, असा आरोप निवेदनात करण्यात आला.
त्यामुळे महामार्ग विभाग, कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांचा यात सखोल करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी